Constitution : वादाला फुटले तोंड! Secular-Socialist शब्द वगळले, काँग्रेसचा आरोप काय
Constitution : भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करुन धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या दोन शब्दांचा त्यात समावेश करण्यात आला होता. पण आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : भारतीय जनता पार्टीने (BJP) राज्य घटना बदलण्याचा घाट घालत असल्याचा आरोप विरोधी खेम्यातून वारंवार होत आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे आशातील वक्तव्य तपासले तर त्यात भाजपवर तिखट हल्ला चढविल्याचे दिसून येते. भाजप देशावर मनुस्मृती लादणार असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी गटातील अनेक नेते करत आहेत. त्यातच आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे. काँग्रेस सातत्याने आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. भारतीय राज्यघटनेत (Constitution Of India) दुरुस्ती करुन धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला होता. पण या दोन शब्दावरुन आज वादाला तोंड फुटले. राज्य घटनेतून Secular-Socialist शब्द वगळल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला. त्यांच्या या आरोपाने देशभरात एकच खळबळ उडाली. तर त्यांचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचा पलटवार भाजपने केला आहे. नेमकं प्रकरण आहे तरी काय?
काय केले आरोप
नवीन संसद भवनात खासदारांना राज्यघटनेची प्रत देण्यात आली. या राज्य घटनेतील प्रस्तावनेतून Secular-Socialist हे शब्द वगळल्याचा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला. राज्यघटनेच्या इंग्रजी प्रतमध्ये हा प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. तर राज्यघटनेच्या हिंदी भाषेतील प्रतीमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द जैसे थे असल्याचे त्यांनी सांगितले. हा मुद्दा त्यांनी संसदेत उठविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हा तर घटना बदलण्याचा डाव
केंद्र सरकारने राज्यघटनेच्या नवीन प्रत दिल्या. ती वाचत असताना प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द इंग्रजी प्रतमध्ये दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. भाजप मुद्दामहून असे प्रकार करत असल्याचा आणि राज्य घटना बदलण्याचाच हा एक डाव असल्याचा आरोप चौधरी यांनी केला. या मुद्यावरुन आता राजकारण तापले आहे.
मुळ प्रतीमध्ये नाही समाजवादी धर्मनिरपेक्ष शब्द
भाजपचे खासदार सुशील मोदी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. काल वाटप करण्यात आलेल्या प्रती या काही संशोधीत, सुधारणा केलेल्या राज्य घटनेच्या प्रती नाहीत. तर मुळ प्रत पुन्हा छापून वितरीत केल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. मुळ प्रतीत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द नव्हते. आता समाजवादी शब्दाची प्रासंगिकता काय आहे? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. हा नाहकचा वाद असल्याचे ते म्हणाले.
इंग्रजी प्रतमध्ये नाही उल्लेख
बुधवारी राज्यघटनेच्या प्रस्तावनेच्या इंग्रजी आणि हिंदी दोन्ही प्रत समोर आणण्यात आल्या. त्यातील इंग्रजी राज्यघटनेतील प्रस्तावनेत सेक्यूलर-सोशलिस्ट हे दोन्ही शब्द गायब असल्याचे दिसते. तर हिंदीच्या प्रतमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द जैसे थे आहेत.
केव्हा करण्यात आला होता समावेश
प्रस्तावना ही राज्यघटनेचे संक्षिप्त ओळख करुन देणारे विधान आहे. राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे आणि उद्दिष्ट्ये त्यातून प्रतिबिंबित होतात. राज्यघटना 26 जानेवरी 1950 रोजी देशाने स्वीकारली होती. 1976 मध्ये राज्यघटनेत 42 वी दुरुस्ती करुन समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला होता.