Parliament attack | भारताच्या संसदेत घुसखोरी करणाऱ्यांबाबत मोठी माहिती समोर, तिघांनी असं का केलं?
Parliament smoke : भारताच्या संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्यां तिघांविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तिघांनी अशा प्रकारचं कृत्य का केलं याबाबत पोलीस तपास करत आहेत त्यासोबतच ते तिघे नेमके कोण आहेत याबाबतची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : भारताच्या संसदेमध्ये आज मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून दोन तरूणांनी उडी मारली त्यानंतर सभागृहामध्ये अध्यक्षांच्या दिशेने पळत सुटले होते. यादरम्यान दोघांनी खासदारांच्या बाकावर स्मोक बॉम्ब टाकल्याने गदारोळ झालेला पाहायला मिळाला. आजच्या दिवशीच 22 वर्षांपूर्वी संसदेवर हल्ला झाला होता. आजच्या दिवशी तरूणांनी संसदेमध्ये घुसल्याने देशभरात संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
थेट संसदेत घुसखोरी करणारे कोण?
संसदेबाहेर झालेल्या या घटनेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. नीलम आणि अमोल शिंदे अशी त्यांची नावे आहेत. नीलम ही महिला असून तिचे वय ४२ वर्षे आहे, ती हरियाणातील हिसार येथील रहिवासी आहे. अमोल शिंदे असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. अमोल महाराष्ट्रातील लातूरचे रहिवासी आहे आणि त्याचं वय 25 वर्षे आहे.
संसद भवनात उडी घेणारा अमोल धनराज शिंदे हा लातुर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील झरी-नवकुंड येथील रहिवाशी असल्याची माहिती असून तो काही दिवसांपासून गाव सोडून इतर ठिकाणी राहत होता, त्याचे आई वडील मजुरी करतात, तर तो गावात राहून सैन्य भरतीची तयारी करीत होता. घरी सांगून तो दिल्लीला गेला होता.
ससंदभवनाबाहेर आंदोलन करताना दोघांनीही माता की जय, जय भीम अशा घोषणा दिल्या होत्या. जो तिसरा व्यक्ती होता त्याचं नाव सागर शर्मा असं असून कर्नाटकातील म्हैसूरचा रहिवासी आहे. बंगळुरूच्या विवेकानंद विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकी पूर्ण केली आहे. संसदेच्या आत आणि बाहेर गदारोळ करणाऱ्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा आणि गृहसचिव अजय भल्ला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संसदेत पोहोचले आहेत.