Ayushman Bharat : आयुष्यमान भारत योजनाच आजारी! CAG ने केली घोटाळ्याची चिरफाड
Ayushman Bharat : CAG च्या अहवालात केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी योजनेला भ्रष्टाचाराची किड लागल्याचे समोर आले आहे. या योजनेचे ऑडिट केल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. काय आहेत अहवालात
नवी दिल्ली | 09 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना (PM-JAY) ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेतून देशातील अनेक कुटुंबांना आरोग्य विम्यातून रुग्णालयात उपचार घेता येतात. पण भ्रष्टाचाऱ्यांनी या योजनेला पण सोडले नाही. सरकारच्या खर्चाचा पडताळा करणारी संस्था CAG ने याविषयीचा महाघोटाळा समोर आणला आहे. केंद्र सरकारच्या एका चांगल्या योजनेला लागलेला हा सुरुंग गंभीर आहे. यामुळे बोगस लाभार्थ्यांनीच योजनेचा लाभ उचलल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारचे यामध्ये कोट्यवधींचे नुकसान तर झालेच आहे. पण मुळ किती लाभार्थी यामुळे वंचित झाले असतील, याचा हिशेब ही लवकरच समोर येईल. CAG ने मंगळवारी संसदेत आयुष्यमान भारत योजनेचा अहवाल सादर केला.
ही तर हद्द झाली
कॅगच्या अहवालात या योजनेतील अनेक पळवाटा पण समोर आल्या. या योजनेतील सदोष यंत्रणा समोर आली. आयुष्यमान भारत योजनेत एकाच मोबाईल क्रमांकावर नोंदणीचा कहर झाला. या योजनेत 7.5 लाख लाभार्थ्यांनी एकाच मोबाईल क्रमांकावरुन नोंदणी केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा केवळ एक मोबाईल क्रमांक नाही, तर दुसऱ्या ही एका मोबाईल क्रमांकावरुन 1.39 लाख लाभार्थ्यांच्या नावाची नोंदणी करण्यात आली आहे.
22 कोटींचा लाभ
जे लाभार्थी योजनेसाठी पात्र नव्हते, अशांना या योजनेत सहभागी करुन घेतल्याचे प्रथमदर्शनी तरी समोर येत आहे. मोबाईल क्रमांकाच्या या गौडबंगालवरुन ही बाब स्पष्ट होते. या बोगस लाभार्थ्यांनी यामार्फत 22 कोटींचा लाभ मिळवल्याचे समोर आले आहे. CAG ने मंगळवारी संसदेत आयुष्यमान भारत योजनेचा अहवाल सादर केला. त्यात या धक्कादायक बाबी समोर आल्या.
10.74 कुटुंबांना जोडण्याचे उद्दिष्ट
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या (NHA) आकड्यानुसार, आयुष्यमान योजना अंतर्गत 7.87 कोटी कुटुंबांची नोंदणी करण्यात आली. केंद्र सरकारने या योजनेचे 73 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. केंद्र सरकारने या योजनेतंर्गत नोव्हेंबर 2022 मध्ये 10.74 कोटी कुटुंबांना जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
चुकीचे नाव, बनावट ओळखपत्र
ऑडिट रिपोर्टनुसार, पडताळणी करण्यातील पळवाटेची मदत बोगस लाभार्थ्यांनी घेतली. लाभार्थ्यांच्या डेटाबेसमध्ये अनेक दोष आढळले. त्याचा फायदा या बोगस लाभार्थ्यांनी उठवला. बोगस नावे, बनावट ओळखपत्र यांचा सर्रास वापर करण्यात आला.
असा बोगस डेटा
बोगस लाभार्थ्यांनी चुकीची नावे दिली. जन्मतारीख खोटी दिली. पत्ता चुकीचा दिला. घरातील सदस्यांची चुकीची माहिती दिली. त्यासाठी बनावट ओळखपत्रांचा वापर करण्यात आला. प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेतील तांत्रिक चुका, पळवाटा त्यांच्या पथ्यावर पडल्या. त्यांनी त्याचा लाभ घेतला. अनेक अपात्र कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. त्यांनी योजनेतंर्गत 0.12 लाख रुपयापासून ते 22.44 कोटी रुपयांपर्यंत लाभ मिळवला.