तुमचे पाय पकडतो, पण एवढं काम करा… मुख्यमंत्री हतबल; IAS अधिकाऱ्याकडे विनवणी
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. कधी जातीनिहाय जनगणना, तर कधी ओबीसांचा प्रश्न तर कधी विविध पक्षांशी युती, आघाडी करून नेहमी चर्चेत असतात. आताही ते एका कारणाने चर्चेत आले आहेत. बिहारमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक विधान केलं आणि चर्चांना उधाण आलं आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आधी इंडिया आघाडीतून एनडीएत आल्याने चर्चेत आले. आता आणखी एका कारणाने चर्चेत आले आहेत. पटना येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी एका आयएएस अधिकाऱ्याला असं काही म्हटलं की त्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी एका कामासाठी थेट अधिकाऱ्याचे हातपाय पकडण्याची भाषा केली. मुख्यमंत्र्याच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. हे विधान करतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार एका सार्वजनिक कार्यक्रमाला आले होते. यावेळी ते मंचावरून संबोधित करत होते. यावेळी त्यांनी भूमी सर्व्हेक्षणवर बोलण्यास सुरुवात केली. यावेळी राज्याचे अप्पर मुख्य सचिव दीपक कुमार सिंह हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी नितीश कुमार यांनी थेट स्टेजवरूनच सनदी अधिकाऱ्याला पाहून विधान केलं. तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो. तुमच्या पाया पडतो. पण जुलै 2025च्या आधी भूमी सर्व्हेक्षण पूर्ण करा. हे काम जर झालं तर किती आनंद होईल माहीत आहे का?, असं मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.
पुढच्या वर्षी निवडणुका
नितीश कुमार यांनी मंचावरूनच अधिकाऱ्याला 2025पर्यंत भूमी सर्व्हेक्षणचं काम पूर्ण करण्याची विनंती केली. पुढच्या वर्षी बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी थेट अधिकाऱ्यालाच साकडं घातल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत जनता दल युनायटेडची बैठक झाली. नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखालीच ही बैठक झाली. यावेळी संघटनेशी संबंधित काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
नितीश यांच्या नेतृत्वावर विश्वास
यावेळी नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर कार्यकारिणी विश्वास टाकणार असल्याचा ठराव संमत करण्यात आला. 2025मध्ये होणारी बिहार विधानसभेची निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढण्याचा प्रस्तावही यावेळी मंजूर करण्यात आला.
आयात माल खपवून घेणार नाही
दरम्यान, भाजप नेते अश्विनी चौबे यांनी एक विधान केलं होतं. बिहारमध्ये एनडीएच्या नेतृत्वातच निवडणुका लढवल्या जाव्यात अशी इच्छा चौबे यांनी व्यक्त केली होती. राज्यातही भाजपने पूर्ण बहुमताने सत्तेत यावं आणि एनडीएचं सरकार स्थापन करावं, असं चौबे म्हणाले होते. मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं होतं. आम्ही आयात करण्यात आलेला माल खपवून घेणार नाही. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल, असं चौबे म्हणाले होते.