पटना, बिहार | 29 जानेवारी 2024 : बिहारमध्ये सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. कालच बिहारला नवं सरकार मिळालं आहे. बिहारचे मुख्यमंत्री जरी नीतीश कुमारच असले, तरी जेडीयू आणि आरजेडीच्या आघाडीचं सरकार जात एनडीए महायुतीचं सरकार सत्तेत आलं आहे. हे सरकार सत्तेत येऊन 24 तास व्हायच्या आत ईडी ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी अर्थात राष्ट्रीय जनता दलचे नेते लालू प्रसाद यादव यांची ईडी चौकशी सुरु झाली आहे.
बिहारच्या राजकारणात दबदबा असणारे नेते लालू प्रसाद यादव यांची ईडी चौकशी सुरु आहे. बिहारची राजधानी पटन्यातील ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी सुरु आहे. जमीनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांच्यावर आहे. याच प्रकरणी ईडी लालू प्रसाद यादव यांची चौकशी करत आहे.
ईडीने या आधीच ॲव्हन्यू कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यात अमित कात्याल, लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी, लेक मीसा भारती, हेमा यादव आणि हृदयानंद चौधरी यांना आरोपी बनवलं आहे. या प्रकरणी ईडी आणि सीबीआय दोन्ही तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. सीबीआयने या प्रकरणी तीन चार्जशीट दाखल केल्या आहेत.
बिहारचे माजी मुख्यमंत्री, राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांची आज ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यांच्यावर जमीच्या बदल्यात नोकरी दिल्याचा आरोप आहे. 2004 ते 2009 या काळात लालूप्रसाद यादव हे रेल्वे मंत्री होते. यावेळी रेल्वेच्या विविध विभागातील रिक्त पदांवर लोकांची नियुक्ती केली गेली. ही नोकरी देण्याच्या बदल्यात लालू यादव यांनी या लोकांरकडून जमीन घेतल्याचा आरोप आहे. या जमीनींचं लालू यांच्या कुटुंबीयांकडे तसंत इन्फो सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरण झाल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी ईडी लालू प्रसाद यादव यांची कसून चौकशी करत आहे.