बिहारमधील सत्तांतर भाजपासाठी धोक्याची घंटा? 2024 लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधकांसाठी शुभसंकेत? काय आहेत देशव्यापी अर्थ? घ्या जाणून
जो जनतेच्या प्रश्नावर लढतो, जनतेचे प्रश्न मांडतो, त्यालाच जनता स्वीकारते, असा टोलाही तेजस्वी यांनी लगावला आहे. विरोधकांनीही इतर राज्यातील जनतेचे प्रश्न मांडले तर भाजपचा पराभव करणे सोपे जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
पाटणा : बिहारमध्ये नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी पुन्हा एकदा मोठी राजकीय खेळी केली आहे. या खेळामुळे एकीकडे बिहारमध्ये भाजपला (BJP) सत्तेतून हद्दपार व्हावे लागले आहे, तर दुसरीकडे राजदला (Tejaswi Yadav) पुन्हा संजीवनी मिळाली आहे. या राजकीय उलथापालथीने एकूणच विरोधकांना अनेक संकेत दिले आहेत. या सत्तांतरामुळे भाजपसाठी पुढची लोकसभा कठीण जाणार असेच दिसतंय. तर विखुरलेल्या विरोधकांसाठी हे एकत्र येण्याचे शुभसंकेत आहेत. असे झाल्यासच भाजपच्या बलाड्या ताकदीपुढे टीकाव लागणार आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तेजस्वीनेही याच संकेतांवर सविस्तर भाष्य केलंय. जो जनतेच्या प्रश्नावर लढतो, जनतेचे प्रश्न मांडतो, त्यालाच जनता स्वीकारते, असा टोलाही तेजस्वी यांनी लगावला आहे. विरोधकांनीही इतर राज्यातील जनतेचे प्रश्न मांडले तर भाजपचा पराभव करणे सोपे जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
भाजपचा अजेंडा चालू देणार नाही
याबाबत बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी आणि बिहारच्या जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपने लोकशाही धोक्यात आणली आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. आपल्या पूर्वजांचा वारसा दुसरा कोणी घेणार नाही. बिहारमध्ये भाजपचा अजेंडा चालू द्यायचा नाही, अशी सगळ्यांची इच्छा होती. आपण समाजवादी लोक आहोत, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र, पंजाबचाही उल्लेख
मागील काही दिवसात मारामारी झाली, मात्र आता पुन्हा दोघेही जनतेच्या सेवेसाठी एकत्र आले आहेत, असेही ते म्हणाले, तसेच नितीश कुमार यांचे कौतुक करताना त्यांनी देशाचे सर्वात अनुभवी मुख्यमंत्री असे वर्णन केले आहे. या सर्वांशिवाय भाजपवर अनेक स्थानिक पक्षांना संपवण्याचा कट रचल्याचा आरोप आरजेडी नेत्याने केला. पंजाबमध्ये अकालीसोबत, महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आणि बिहारमध्येही असेच षडयंत्र रचले जात होते.
नितीश कुमार काय म्हणाले?
प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीश कुमार यांनी आता महाआघाडीत सहभागी होऊन बिहारच्या जनतेची सेवा करणार असल्याचेही म्हटले आहे. 2017 मध्ये त्यांनी महाआघाडीपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला होता, याचीही त्यांना खंत आहे. पण आता ते एका नव्या सुरुवातीबद्दल बोलत आहेत. तेजस्वी यांच्यासोबत त्यांना बिहारच्या विकासावर भर द्यायचा आहे. असेही त्यांनी स्पष्ट केलंय. या नव्या सरकारमध्ये कोणते मंत्रिपद कोणाला मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तेजस्वी यांना उपमुख्यमंत्री बनवले जाऊ शकते आणि गृहखातेही त्यांच्याकडे जाऊ शकते, अशी अटकळ आहे. दोन ते तीन मंत्रिपदे देण्याची मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.