Bihar Politics : जदयू-राजद सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांकडेच, तर विधानसभा अध्यक्षपद, उपमुख्यमंत्री आणि गृहखातं राजदकडे
डीयू आणि राजद यांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांच्याकडेच राहील. तर उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद आणि विधानसभा अध्यक्षपद (Assembly Speaker) राजदकडे जाण्याची दाट शक्यता आहे.
पाटना : महाराष्ट्रात राजकीय भूकंपानंतर आता बिहारमध्येही मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलाय. आता बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू आणि तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांचा राजद मिळून नवं सरकार स्थापन करणार आहेत. त्यांच्यातील सत्तेचा फॉर्मुला ही निश्चित झाल्याची माहिती मिळतेय. जेडीयू आणि राजद यांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांच्याकडेच राहील. तर उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद आणि विधानसभा अध्यक्षपद (Assembly Speaker) राजदकडे जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या राजदची कमान पूर्णपणे तेजस्वी यादव सांभाळत आहेत. मात्र वेळोवेळी लालू प्रसाद यादव यांना राज्यातील स्थितीची आढावा दिला जात आहे.
राजदचे अन्य बडे नेते राज्यातील स्थितीवर नजर ठेवून आहेत. मात्र राज्यातील राजकीय हालचालींपासून त्यांना दूर ठेवण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेजस्वी यादव हे नितीश कुमारांकडे मुख्यमंत्री पद देण्यासाठी तयार आहेत. मात्र उपमुख्यमंत्रीपद आणि गृहखातं आपल्याकडे घेण्यावर तेजस्वी यादव ठाम आहेत. बिहारमध्ये आजवर नितीश कुमार यांनी आपल्याकडेच गृहखातं ठेवलं. मात्र यावेळी सरकार बनवण्याच्या अटीवर गृहखातं आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्याकडे दिले जाईल. इतकंच नाही तर सरकार बनवण्यासाठी विधानसभा अध्यक्षपदही आरजेडीकडेच देण्यात येणार आहे.
भाजपपासून अंतर राखण्याचा नितिश कुमारांचा सातत्याने प्रयत्न
गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि भाजपमधील दरी वाढत होती. नितीश कुमार भाजपपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं करताना दिसत होते. साधारण महिनाभरापूर्वी जातीय जनगणनेच्या मुद्द्यावर तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यात 50 मिनिटे चर्चा झाली होती. या बैठकीनंतर तेजस्वी यादव यांचे नितीश कुमारांबाबतचे सूर काहीसे बदलल्याचं जाणवत होतं.
बिहारच्या राजकारणातील टर्निंग पॉईंट – जेडीयू
बिहारच्या राजकारणात काहीही शक्य आहे, असे संकेत जेडीयूचे खासदार रामप्रीत मंडल यांनी सोमवारी दिल्लीत दिले होते. हा राज्याच्या राजकारणातील टर्निंग पॉईंट असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आम्ही तिथे पोहचण्यापूर्वीच काहीही घडू शकते, असेही ते म्हणालेत. नितीशकुमार पक्षाचे नेते आहेत, तो जे निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.