राबडी देवींच्या नावाने जमीन करा, उद्या रेल्वेत नोकरी! बिहारच्या कथित घोटाळ्याची चर्चा, काय आहेत आरोप?
लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी कोणतीही जाहिरात न देता अनेक लोकांना नोकरी लावली असे आरोप आहेत.
पाटणा : राबडी देवींच्या (Rabdi Devi) नावाने जमीन करा आणि दुसऱ्याच दिवशी रेल्वेची नोकरी पक्की. बिहारमध्ये (Bihar) गाजत असलेल्या लँड फॉर लॅब घोटाळ्याचं वर्णन एवढ्या एका ओळीतूनच करण्यात येतंय. यात लालू प्रसाद यादव, पत्नी राबडी देवी आणि त्यांच्या मुलींसह एकूण १६ जणांवर आरोप करण्यात आलेत. या प्रकरणी आज सकाळपासूनच बिहारमध्ये छापेमारी सुरु आहे. माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी सीबीआयचे अधिकारी पोहोचले आहेत. या निमित्ताने अनेक गोष्टी उघड होत आहेत.
तपास संस्थांना हाती आलेल्या माहितीनुसार बिहार मध्ये अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. ज्यात रेल्वे विभागात नोकरी मिळण्याच्या तीन दिवस आधी लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या नावाने जमीन हस्तांतरित केलेली असेल.लँड फॉर जॉब घोटाळ्यात यादव यांच्या विरोधात जवळपास 7 केसेस नोंद झाल्याचे उघडकीस आले आहे. सदर प्रकरणात दिल्लीतील. राऊस अवेन्यू कोर्टने लालूप्रसाद यादव, राबडी देवी, मिसा भारती यांना समन जारी केले आहेत. 15 मार्च रोजी त्यांना कोर्टात उपस्थित रहावं लागणार आहे.
नोकऱ्या देण्याचं नेटवर्क?
लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी कोणतीही जाहिरात न देता अनेक लोकांना नोकरी लावली असे आरोप आहेत. नोकरीच्या बदल्यात लोकांकडून जमिनी घेण्यात आल्या. या जमिनी लालू यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे करण्यात आल्या. जवळपास 1लाख ५ हजार 292 चौरस फूट आहेत. ज्यांना नोकरी लावून देण्यात आली त्यांची नियुक्ती रेल्वेच्या विविध झोन मध्ये करण्यात आली. सीबीआयने सर्वप्रथम 23 डिसेंबर 20२१रोजी प्रारंभिक तपासाला सुरुवात केली. सीबीआयच्या मते, रेल्वे भरतीत कोणतीही जाहिरात न देता, तसेच सार्वजनिक नोटीस न देता या नियुक्त्या करण्यात आल्या. पाटण्यातील नागरिकांना मुंबई, जबलपूर, कोलकत्ता, जयपूर आणि हाजीपूर अशा ठिकाणी विविध झोनमध्ये नियुक्ती देण्यात आली. अर्जदारांना सुरुवातीला अस्थाई नोकरी दिली जाते. जमिनीचा सौदा पूर्ण झाल्यानंतर त्यांची नोकरी कायम करण्यात येते. अशाप्रकारे नोकऱ्या देण्याचं नेटवर्क तयार करण्यात आलं होतं, असा आरोप सीबीआयने केला आहे. या प्रकरणी ईडी आणि सीबीआयच्या तपासात धक्कादायक पुरावे हाती आल्याचे म्हटलं जातंय.
७ केसेस उघड
सीबीआयच्या तपासात पाटण्यातील एक केस उघड झाली आहे. पाटण्यात किशन देव राय यांनी 6 फेब्रुवारी 2008 मध्ये खूप कमी किंमतीत जमीन विकली. ती राबडी देवी यांच्या नावाने केली. 3,375 चौरस फूट जमीन फक्त 3.75 लाख रुपयांत राबडी देवींना विकली. त्यांच्या कुटुंबातील राजकुमार सिंह, मिथिलेश कुमार आणि अजय कुमार यांना मध्य रेल्वेत मुंबईत ग्रुप डी पदावर नोकरी मिळाली. अशा प्रकारे तब्बल सात प्रकरणं सीबीआयच्या हाती लागली आहेत. रेल्वेत जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याचं हे मोठं नेटवर्क आणखी किती विस्तारलंय, याची चौकशी सीबीआयतर्फे केली जात आहे.