बिल्किसबानो अत्याचार प्रकरणासाठी आजचा दिवस महत्वाचा, काहीच वेळात’सर्वोच्च’ सुनावणी
गुजरातमधील गोध्रा हत्याकांडात पीडित असलेल्या बिल्किसबानो प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
संदीप राजगोळकर, प्रतिनिधी, नवी दिल्ली : गुजरातमधील गोध्रा हत्याकांडात पीडित असलेल्या बिल्किसबानो प्रकरणात (Bilkis Bano Case) आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. आरोपींची शिक्षा गुजरात सरकारने माफ केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावली होती. यावर गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) आपलं उत्तर सादर केलं आहे. त्यानंतर या प्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे देशाचं लक्ष आहे.
गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात बिल्किसबानो प्रकरणातील 11 दोषींची 14 वर्षांची शिक्षा पूर्ण झाली आहे आणि त्यांचं वर्तन चांगलं होतं. त्यामुळं त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे.
विशेष बाब म्हणजे गुजरात सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एक महत्वपूर्ण बाब समोर आली आहे. मुंबईतल्या CBI च्या एसपींनी दोषींना सुटका देण्यास 2019 आणि 2021 अशी दोन वेळा परवानगी नाकारली होती. तर 22 मार्च 2021 ला मुंबई सत्र न्यायालयाने देखील सुटकेस नकार दिला होता. मात्र केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या मंत्रालयाने जुलैमध्ये सुटकेस परवानगी दिली होती.
बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणातील 11 दोषींना गुजरात सरकारच्या शिफारसी नंतर सोडण्यात आलं होतं. त्यानंतर या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दोन आठवड्यात रिपोर्ट सादर करण्यास सांगितले होते. त्यावर गुजरात सरकारने आपला अहवाल सादर केला आहे. त्यानंतर आता सुनावणी होतेय.
न्यायमुर्ती अजय रस्तोगी, न्यायमुर्ती बी वी नागरत्ना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. आज या केससाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे.