बिपरजॉयने गुजरातनंतर ‘या’ राज्यात घातले थैमान; वीज, रेल्वे व्यवस्था पूर्णतः कोलमडली…
बिपरजॉय चक्रीवादळामुळे उत्तर पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. रेल्वेने अमृतसर-गांधीधाम एक्सप्रेस, जोधपूर-भिलडी एक्सप्रेस, वलसाड-भिलडी एक्सप्रेस, जोधपूर-पालनपूर एक्सप्रेस, जोधपूर-पालनपूर एक्सप्रेस, बारमेर-मुनाबाव एक्सप्रेस, मुनाबाव-बाडमेर एक्सप्रेस यासह 13 गाड्या रद्द केल्या आहेत.
नवी दिल्ली : गुजरातनंतर आता बिपरजॉय चक्रीवादळाचा राजस्थानच्या अनेक भागाना जोरदार फटका बसला आहे. गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे वाळवंटातील बारमेर जिल्हाही हादरला आहे. अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे 500 हून अधिक गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती गावांमध्ये शेकडो कच्ची घरे कोसळली आहेत.तर अनेक भागात 5 ते 7 फूट पाणी घरांमध्ये शिरले आहे.
सध्या एनडीआरएफ-एसडीआरएफचे पथकाकडून बचावकार्य सुरु आहे. येत्या 12 तासांमध्ये आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
अंधाराचे साम्राज्य
सध्या हवामान खात्याने बाडमेर, जालोर आणि सिरोहीमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तर पाली आणि जोधपूरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ असून, जैसलमेर, बिकानेर, चुरू, सीकर, नागौर, झुंझुनू, अजमेर, उदयपूर, राजसमंद, जयपूर, जयपूर सिटी, दौसा, अलवर, भिलवाडा, चित्तौडगड, करौली, सवाई माधोपूर, टोंक, बुंदीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 500 हून अधिक गावांमध्ये आता अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
प्रशासनाचा बोजवारा
वादळामुळे विजेचे खांब पडल्याने आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने गेल्या 24 तासांपासून बारमेरमधील 500 हून अधिक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. कोणत्याही मार्गाने गावात वीज सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, मात्र सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे.
रेल्वेने 13 गाड्या रद्द केल्या
बिपरजॉय चक्रीवादळामुळे उत्तर पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. रेल्वेने अमृतसर-गांधीधाम एक्सप्रेस, जोधपूर-भिलडी एक्सप्रेस, वलसाड-भिलडी एक्सप्रेस, जोधपूर-पालनपूर एक्सप्रेस, जोधपूर-पालनपूर एक्सप्रेस, बारमेर-मुनाबाव एक्सप्रेस, मुनाबाव-बाडमेर एक्सप्रेस यासह 13 गाड्या रद्द केल्या आहेत.
नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन
बिपरजॉयमुळे जालोरमध्येही खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा वादळाचा प्रवेश झाल्यापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. सांचोरमध्ये 150 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याची माहितीही हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे चितळवण आणि राणीवाडा येथे 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
झाड उन्मळून पडली
राणीवाडा येथे मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. राज्यमंत्री सुखराम विश्नोई यांनी सांचोर आणि चितलवणाच्या नेहारमधील बाधित भागांना भेट दिली आणि तेथे तैनात असलेल्या एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमला निर्देश देण्यात आल्या आहेत.