भाजपाला मनिष सिसोदियांची हत्या करायची आहे, कैद्यांना एक इशारा केला की… दिल्ली सरकारचा खळबळजनक आरोप काय?
मनीष सिसोदिया यांना विपश्यनेच्या सेलमध्ये ठेवलं जावं, असे कोर्टाचे आदेश आहे. असं असूनही त्यांना गंभीर गुन्हेगारांच्या सेलमध्ये ठेवण्यात आलंय, असा आरोप आपने केला आहे.
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने (AAP) माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना तुरुंगात दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरून गंभीर आरोप केला आहे. भाजपा मनीष सिसोदियांची हत्याही घडवून आणू शकते, असा खळबळजनक दावा आम आदमी पार्टीचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. सिसोदिया यांना तुरुंगात पाठवण्यामागे भाजपचं मोठं षडयंत्र आहे, असा आरोप आपने केला आहे.होळीच्या दिवशीच आपने तातडीने पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हे गंभीर आरोप केले. मनीष सिसोदिया यांना केंद्र सरकारने तिहार तुरुंगातील १ नंबर जेलमध्ये ठेवलंय. फर्स्ट ट्रायल असलेल्यांना या जेलमध्ये ठेवलं जात नाही. अत्यंत धोकादायक आणि हिंसक गुन्हेगारांसाठी या जेलचा वापर करतात.
‘हिंसक गुन्हेगारांमध्ये ठेवलं’
आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले, मनीष सिसोदिया यांना अत्यंत धोकादायक गुन्हेगारांमध्ये ठेवण्यात आलंय.अगदी लहानसा इशारा केला तरी हे गुंड कुणाचीही हत्या घडवून आणू शकतात. मनिष सिसोदिया हे भाजपचे राजकीय शत्रू आहेत. पण राजकारणातील शत्रुत्व एवढ्या भयंकर पातळीपर्यंत जाऊ शकते का? दिल्ली विधानसभा आणि MCD निवडणुकीत भाजप आम आदमी पार्टीला हरवू शकली नाही. त्याचा बदला अशा प्रकारे घेतला जातोय, असा आरोप आपकडून करण्यात आलाय. या पर्करणात पंतप्रधान नरेंद्र मोदी का गप्प आहेत? आपला राजकीय नुकसान पोहोचवता येत नाही, त्यामुळे नेत्यांना जेलमध्ये पाठवलं जातंय, आमच्या नेत्यांची हत्या करण्याचा भाजपचा कट आहे, असा आरोप आपने केला आहे.
आपची मागणी काय?
मनीष सिसोदिया यांना विपश्यनेच्या सेलमध्ये ठेवलं जावं, असे कोर्टाचे आदेश आहे. असं असूनही त्यांना गंभीर गुन्हेगारांच्या सेलमध्ये ठेवण्यात आलंय. हे सगळं आपोआप घडत नाहीये. तर केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून घडतंय, असा आरोप आम आदमी पार्टीने केलाय. सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया सध्या संकटात आहेत. केंद्र सरकार त्यांची राजकीय हत्या घडवून आणेल काय, अशी शंका आपने व्यक्त केली आहे. दिल्लीत कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने मनीष सिसोदिया यांना अटक झाली आहे.
केजरीवाल यांची आज ध्यानधारणा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ध्यानधारणा सुरु केली आहे. पंतप्रधान मोदी देशातील कोट्यवधी रुपये लुटणाऱ्यांना जवळ करत आहेत आणि दिल्लीत शाळा, रुग्णालयं उभारणाऱ्यांना जेलमध्य पाठवत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. देशातील लोकशाहीसाठी आज आपण ध्यानधारणा करत आहोत, असं त्यांनी सांगितलं. दुपारी पाच वाजेपर्यंत केजरीवालांचं हे ध्यान सुरु राहणार आहे.