Marathi News : भाजपला शिंदे सरकारचं ओझं झालंय; संजय राऊत यांचा दावा
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं राजकीय विधान केलं आहे. भाजपला शिंदे सरकारचं ओझं झालं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा तर्कांना उधाण आलं आहे.
नवी दिल्ली : भाजपला राज्यातील शिंदे सरकारचं ओझं झालं आहे. हे ओझं किती काळ घेऊन फिरायचं असं त्यांना वाटतं आहे. त्याबाबतच्या चर्चा मीही ऐकून आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. बारसूतील भूसंपादन रद्द करा आणि सर्व्हेक्षण मागे घ्या, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
बारसूच्या संदर्भात शरद पवारांची भूमिका ऐकली. स्थानिक लोकांशी चर्चा करा. त्यांना विश्वासात घ्या, असं शरद पवार म्हणाले आहेत. म्हणजे काय करायचं? स्थानिकांचा या सरकारवर विश्वासच नाही. सत्ताधारी उद्धव ठाकरे यांचं पत्र दाखवत होते. उद्धव ठाकरे यांनी त्यावर स्पष्टपणे सांगितलं आहे. केंद्राकडून वारंवार पर्यायी जागेची मागणी होत होती. म्हणून उद्धव ठाकरे यांनी पर्यायी जागा सूचवली. पण अडिच वर्ष सत्तेत असताना ही जागा मिळावी म्हणून जोर जबरदस्ती केली नाही. लोकांना नको असेल तर बारसूही नको ही आमची भूमिका होती, असं संजय राऊत म्हणाले.
तर यादी जाहीर करू
स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत. मोर्चा निघतोय. उद्धव ठाकरेही तिकडे जाणार आहेत. वातावरण चिघळत ठेवण्यापेक्षा भू संपादन आणि सर्व्हेक्षण मागे घेतलं पाहिजे. तोपर्यंत वातावरण शांत होणार नाही. भूसंपादन रद्द केलं नाही तर शिवसेना पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच बारसूत परप्रांतियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांची यादी जाहीर करावी. अन्यथा स्थानिक खासदार विनायक राऊत हे यादी जाहीर करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
करू द्या टीका
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. त्याचाही राऊत यांनी समाचार घेतला. करू द्या टीका. ही लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. टीका करण्याचा अधिकार आहे. पण सत्तार यांच्या टीकेने काही फरक पडणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.