Lok Sabha : महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात बीजेपीने पहिल्यांदाच महिला उमेदवाराला दिले तिकीट, कोण आहेत पल्लवी डेम्पो ?
भाजपाने काल आपल्या लोकसभेची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादी 111 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत अनेक चर्चेतील चेहरे आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपाने बॉलीवूड अभिनेत्री कंगना हिला तिकीट दिले आहे.
भाजपाने लोकसभा निवडणूकांसाठी आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या पाचव्या यादीत 111 नावे आहेत. या यादीत अनेक चर्चित नावे सामील आहेत. यावेळच्या लोकसभेच्या निवडणूकांसाठी भाजपाने गोव्यातून पहिल्यांदाच महिलेला तिकीट दिले आहे. भाजपाने साऊथ गोवा लोकसभा मतदार संघातून पल्लवी डेम्पो यांना उमेदवार जाहीर केले आहे. या मतदार संघातून भाजपा केवळ दोनदा जिंकली आहे. त्यामुळे या पल्लवी डेम्पो अखेर कोण आहेत याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे.
कोण आहेत पल्लवी डेम्पो ?
पल्लवी डेम्पो एक महिला उद्योजक आहेत. त्या शिक्षण आणि मिडीया क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. सध्या साऊथ गोवा लोकसभेतून कॉंग्रेसचे खासदार फ्रांसिस्को सरदिन्हा आहेत. पल्लवी यांचे पती श्रीनिवास डेम्पो देखील गोव्याचे लोकप्रिय उद्योजक आहेत. ते गोवा चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष देखील आहेत. पल्लवी डेम्पो शिक्षण क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्या उद्योग क्षेत्रातील मिडीया आणि रियल इस्टेट देखील सांभाळत आहेत.
पल्लवी डेम्पो या 49 वर्षांच्या आहेत. त्यांनी केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. एमआयटी पुणे येथून एमबीए केले आहे. पल्लवी गोव्यातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहे. डेम्पो कुटुंब गोव्यात महिलांना शिक्षण देण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करते. त्यांनी ग्रामीण शाळांना दत्तक योजनेंतर्गत सरकारी शाळांना दत्तक देखील घेतले आहे.
इंडो-जर्मन एज्युकेशनल एंड कल्चरल सोसायटीच्या अध्यक्ष
पल्लवी इंडो-जर्मन एज्युकेशनल एंड कल्चरल सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. जर्मनी आणि गोवा यांच्यात संस्कृती संवर्धनाचे काम देखील त्या करतात. त्या गोवा मोडा फाऊंडेशनच्या ट्रस्टी देखील आहेत. पल्लवी गोवा कॅन्सर सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीच्या सदस्य आहेत. तसेच इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या महिला परिषदेच्या कोअर कमिटी सदस्य देखील आहेत. पल्लवी गोवा युनिव्हर्सिटी संबंधित अकादमीच्या सदस्य देखील होत्या.
मंडीतून कंगनाला तिकीट
भाजपाच्या पाचव्या यादीतील 111 उमेदवारांत अनेक चर्चित चेहरे आहेत. भाजपाने अभिनेत्री कंगना रनौत हीला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून निवडणूकीत उतरविले आहे. तर पिलीभीत येथील खासदार वरुण गांधी यांचे तिकीट यंदा कापले आहे. तर त्यांची आई मेनका गांधी यांना सुल्तानपुर येथून पुन्हा तिकीट दिले आहे.