मुंबई: भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे द्यावी, अशी मागणी केली आहे. सोशल मीडियावर या मागणीला प्रचंड पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे काही काळ ट्विटवर #Gadkari हा हॅशटॅग ट्रेंडमध्येही होता. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री असणारे नितीन गडकरी हे झपाट्याने काम करण्यासाठी ओळखले जातात. सध्याच्या घडीला ते मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक आहेत. मुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरींकडे सोपवणार का, हे पाहावे लागेल.
सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. भारताने मुस्लीम आक्रमक आणि ब्रिटीश साम्राज्यशाहीचे संकट ज्याप्रमाणे परतावून लावले तसेच कोरोनाच्या संकटानंतरही भारत तग धरून राहील. नियमांचे पालन न केल्यास भारताला कदाचित कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr Modi) यांनी कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे सोपवायला हवीत. पंतप्रधान कार्यालयावर विसंबून राहणे, हे निरुपयोगी ठरेल, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोकळीक दिली आहे. मात्र, अतिनम्र स्वभावामुळे त्यांना ते सर्व निर्णय प्रभावीपणे राबवू शकत नाहीत. नितीन गडकरी त्यांच्या मदतीला आल्यास डॉ. हर्ष वर्धन अधिक खुलून काम करतील, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले.
गडकरीजी मानलं… 24 तासांत ‘एक्स्प्रेस वे’चा अवघड भाग बांधला; विश्वविक्रमाचे फडणवीसांकडून कौतुक
कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने महाराष्ट्रात ऑक्सिजन तुटवडा जाणवत असताना नितीन गडकरी यांनी नागपुरात ठाण मांडून सूत्रे हाताळली होती. त्यांनी विदर्भासासाठी ऑक्सिजन आणण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, विदर्भातलं ऑक्सिजन पुरवठ्याचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा, असं वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही.
मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी यांचा वरचा क्रमांक लागतो. नितीन गडकरी यांचा प्रशासनावर असणारा वचक आणि झपाट्याने काम उरकण्याची क्षमता या दोन्ही त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. याशिवाय, उपजत असलेल्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना अनेक विषयांचे ज्ञान आहे. इंधननिर्मितीसाठी इथेनॉलचा प्रभावीपणे वापर असो किंवा महामार्ग प्रकल्पांचे वेगाने काम करण्याची हातोटी नितीन गडकरी यांच्याकडे आहे.
नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्या चर्चेनंतर जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याचे जाहीर केले होते. सध्याची परिस्थिती पाहून गडकरी यांनी व्हेंटिलेटर्सच्या पुरवठ्यासाठी स्वत:हून पढाकार घेतला होता.
महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते . कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात मिळाली होती.
संबंधित बातम्या:
‘त्या’ महान अधिकाऱ्यांची छायाचित्रे इमारतीत लावा; नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले