भाजपच्या तोंडाला रक्त लागलंय, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मंत्र्यांचा घोडेबाजारात सहभाग : अशोक गहलोत
राजस्थानमधील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत (BJP Horse Trading Ashok Gehlot).
जयपूर : राजस्थानमधील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत (BJP Horse Trading Ashok Gehlot). राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी सुरु असलेल्या घोडेबाजारात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मंत्र्यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री गहलोत यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे (Rajasthan Political Crisis). याआधी मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) आणि त्यांच्या गटातील आमदारांनी सचिन पायलट गटावरही जोरदार हल्ला चढवला होता.
अशोक गहलोत म्हणाले, “भाजपचा घोडेबाजाराचा खेळ खूप मोठा आहे. त्यांच्या तोंडाला रक्त लागलं आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश ते यशस्वी झाल्यामुळेच ते आता राजस्थानमध्ये प्रयोग करत आहेत. देशाचं गृहमंत्रालयच या कामात सहभागी आहे. धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल यांच्यासह अनेक मंत्र्यांचा या घोडेबाजारात सहभाग आहे.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने राजस्थानमध्ये सुरु असलेला तमाशा बंद करायला हवा. राजस्थानमध्ये घोडेबाजाराचे दर वाढले आहेत. विधानसभेच्या अधिवेशनाची घोषणा होताच त्यांनी घोडेबाजाराचे दर आणखी वाढवले आहेत,” असं अशोक गहलोत म्हणाले.
दरम्यान, राजस्थानमधील राजकीय उलथापालथ आणि घोडेबाजाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे गहलोत गटातील सर्व आमदार शुक्रवारी (31 जुलै) पुढील 14 दिवसांसाठी जयपूरमधून जैसलमेरला गेले आहेत. राजस्थान विधानसभेचं अधिवेशन 14 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून काँग्रेसने आपल्या आमदारांना तोपर्यंत जैसलमेरमधील रिसॉर्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
हे सर्व आमदार 13 जुलैपासून हॉटेल फेअरमाऊंटमध्ये थांबलेले होते. सचिन पायलट यांच्यासह त्यांचे समर्थक 18 आमदार संपर्काबाहेर गेल्यानंतर काँग्रेसने सर्व आमदारांना या हॉटेलमध्ये ठेवलं होतं.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी याधीच आमदारांशी बोलताना घोडेबाजार करुन सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असला तरी सरकार सुरक्षित असल्याचा विश्वास दिला आहे. बसपाच्या आमदारांना काँग्रेसमध्ये सामावून घेणं चुकीचं नाही. राज्यसभेत सत्ताधारी भाजपने देखील तेदेपाच्या 4 खासदारांना भाजपमध्ये सामील करुन घेतलं होतं. यावेळी अशोक गहलोत यांनी 14 ऑगस्टला विधानसभेचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर बहुमत सिद्ध करणार असल्याचेही संकेत दिले आहेत.
हेही वाचा :
राजस्थानात 14 ऑगस्टपासून विधानसभेचं सत्र, गहलोत सरकारच्या प्रस्तावाला अखेर राज्यपालांचा हिरवा कंदिल
Ashok Gehlot | फाडफाड इंग्रजी आणि हँडसम दिसणे पुरेसे नाही, गहलोतांचा पायलटांना टोला
Rajasthan Live | मी भाजपमध्ये जाणार नाही, सचिन पायलट यांची मोठी घोषणा
BJP Horse Trading Ashok Gehlot