80 खासदारांची पडणार विकेट! लोकसभेच्या रिंगणातून करणार भाजप आऊट
BJP MP | लोकसभेच्या पैकीच्या पैकी जागा जिंकण्यासाठी भाजप ताकही फुंकून फुंकून पित आहे. 400 पारचा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी देशातील 80 खासदारांची विकेट पडणार आहे. नमो ॲपवर या खासदारांविरोधात तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर त्यांना लोकसभेच्या रिंगणातून आऊट करण्याचा निर्णय होणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
संदीप राजगोळकर, प्रतिनिधी, नवी दिल्ली | 2 March 2024 : भाजपमध्ये मोठा भूकंप होणार आहे. देशभरातील जवळपास 80 खासदारांना नारळ देण्यात येणार आहे. त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याविषयी भाजपचे वरिष्ठ साशंक आहेत. शतप्रतिशत भाजपसाठी पक्षाने कंबर कसली आहे. अनेक जागांवर सध्याच्या काही खासदारांविषयी तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर भाजपची केंद्रीय समिती सतर्क झाली आहे. भाजप लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर करेल. त्यात सध्याच्या मोठ्या चेहऱ्यांसह भाजपसाठी कठीण असलेल्या मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. पण देशभरातील जवळपास 80 खासदारांना तिकीट नाकारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केंद्रीय समिती ॲक्शन मोडवर
भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी आतापर्यंत उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगाणा, उत्तराखंड, त्रिपुरा आणि इतर काही राज्यातील नेत्यांशी चर्चा केली आहे. काही मतदारसंघात नवीन चेहेरे देण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वीच्या खासदाराला पुन्हा तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. भाजपच्या सूत्रांनुसार, या राज्यातून प्रत्येक मतदार संघासाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. आता भाजपची केंद्रीय निवडणूक समिती या उमेदवांराविषयी निर्णय घेईल. त्यानंतर मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. पण यामध्ये 80 खासदारांना नारळ देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ही आहेत कारणं
- काही खासदारांचं वय आता 70 वर्षे अथवा अधिक आहे. त्यांची कामगिरी पण स्तूत्य नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी नाराजीचा सूर आहे. अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्यात याविषयी चर्चा झाल्याचे कळते
- ज्या खासदारांना नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरविण्यात आले होते. त्यांना पुन्हा खासदारकीसाठी संधी देण्यात येणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना केंद्रातून एकप्रकारे डच्चू मिळाल्याचे समोर आले आहे. त्यांना एकतर संघटनात्मक कार्यात अथवा राज्यात कामगिरी दाखवावी लागणार आहे.
- भाजपने नमो ॲपवर तिथल्या खासदारांची कामगिरी, त्यांचे वर्तन याविषयीचा आढावा घेतला. त्यात काही खासदारांविरोधात तक्रारींचा पाऊस आला. त्यामुळे त्यांना नारळ भेटणार, हे निश्चित असल्याचे समोर येत आहे.
या खासदारांना तिकीट नाही
ज्यांनी सत्तरी ओलांडली अथवा सत्तरीत आहेत, अशा खासदारांना तिकीट नाकारल्या जाऊ शकते. यामध्ये संतोष गंगवार, रीता बहुगुणा यांच्या नावाची चर्चा आहे. तर एंटी इनकम्बंसीचा आधार घेत काहींची विकेट पडू शकते. यात महाराष्ट्रातील काही खासदारांचा पण समावेश असल्याचे समजते.