भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना चोरांचा फटका, पत्नीची कार गेली चोरीला, सर्व्हिस सेंटरमधून कार गायब
दिल्लीत चोरीच्या घटना सर्रास घडत आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या चोरीच्या घटना कानावर पडतच असतात, मात्र यावेळी चोरट्यांनी एका नेत्याला लक्ष्य केले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना चोरांचा फटका बसला आहे. जे.पी. नड्डा यांच्या पत्नीची आलिशान कार चोरीला गेली आहे. दक्षिण पूर्व दिल्लीतील गोविंदपुरी परिसरातून ही कार चोरीला गेली अशी माहिती समोर आली.
राजधानी दिल्लीत गुन्ह्यांच्या घटना वाढल्या आहेत. चोरीची प्रकरणं तर सर्सास घडत आहेत. दररोज कुठे ना कुठे तरी चोरीच्या घटना घडतच असतात. पण यावेळी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना चोरट्यांचा फटका बसला आहे . हो, हे खरं आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या पत्नीची आलिशान कार चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व दिल्लीतील गोविंदपुरी परिसरातून ही कार चोरीला गेली. कारचा ड्रायव्हर हा गोविंदपुरी येथील एका सर्व्हिस सेंटरमध्ये कार ठेवून त्याच्या घरी जेवणासाठी गेला होता, अशी माहिती समोर आली आहे.
जोगिंदर सिंग असे ड्रायव्हर ते नाव असून तो गोविंदपुरी भागात राहतो. 19 मार्च रोजी चोरीची ही घटना घडली. त्या दिवशी जोगिंदर सिग हे HP03D0021 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर कार पार्क करून जेवणासाठी घरी गेले. मात्र थोड्या वेळाने ते परत आले असता, तेथे ती कारच नव्हती. कोणीतरी कार पळवून नेली. दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान ही घटना घडली.
पोलिस करत आहेत प्रकरणाचा तपास
कार चोरीला गेल्याचे लक्षात येताच जोगिंदर यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता कार गुरुग्रामच्या दिशेने जाताना दिसली. मात्र, अद्याप कारचा काहीही पत्ता लागला नाही.
जे.पी. नड्डांच्या पत्नीच्या नावे आहे कार
चोरीला गेलेल्या या कारचा नंबर हिमाचल प्रदेशमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांच्या पत्नीच्या नावे रजिस्टर्ड आहे. जेपी नड्डा मूळचे हिमाचलचे आहेत. चोरीचे हे प्रकरण एका हायप्रोफाईल व्यक्तीशी संबंधित असल्याने पोलीसही सतर्क झाले आहेत. पोलिसांची सात पथके या चोरीचा तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी फरिदाबाद येथून एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ज्याची चौकशी केली जात आहे.