Prophet Mohammad : नुपूर शर्मांना भाजपचा दणका, पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त विधानानंतर निलंबन, तर एकाला बाहेरचा रस्ता
एक पत्र जारी करून भाजपने म्हटले आहे की, भारताच्या हजारो वर्षांच्या प्रवासात अनेक धर्मांचा जन्म आणि विकास झाला असून कोणत्याही धर्माच्या उपासकांचा अपमान भाजपला मान्य नाही. गेल्या काही दिवसांपासून याच मुद्द्यावरून बराच वाद पेटला होता.
नवी दिल्ली : पैगंबर मोहम्मद (Prophet Mohammad) यांच्याबाबत एका टीव्हीरील चर्चेदरम्यान वादग्रस्त विधान केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने(BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित केले आहे. त्यांच्याविरोधात पक्षाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी भाजपचे मीडिया प्रभारी नवीन कुमार जिंदाल यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नवीन कुमार जिंदाल यांनी या मुद्द्यावर काही वादग्रस्त ट्विट केले होते.तत्पूर्वी, एक पत्र जारी करून भाजपने म्हटले आहे की, भारताच्या हजारो वर्षांच्या प्रवासात अनेक धर्मांचा जन्म आणि विकास झाला असून कोणत्याही धर्माच्या उपासकांचा अपमान भाजपला मान्य नाही. गेल्या काही दिवसांपासून याच मुद्द्यावरून बराच वाद पेटला होता. त्यामुळे आता तरी या कारवाईनंतर या वादावर पडदा पडणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पक्षाने पत्राकात काय म्हटले आहे?
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात पक्षाने म्हटले आहे की भारतीय जनता पक्ष कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भावना दुखावणारा असा कोणताही विचार स्वीकारत नाही. तसेच भाजप अशा कोणत्याही विचारांना कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहनही देत नाही. त्यात भाजपने म्हटले आहे की, देशाच्या संविधानानेही भारतातील प्रत्येक नागरिकाने सर्व धर्मांचा आदर करावा अशी अपेक्षा केली आहे.
सोशल मडियावर द्वेष परवणारे ट्विट
नुकतेच टीव्हीच्या एका वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेदरम्यान भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मुहम्मद यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केले होते, त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील लोक संतापले आहेत. अशा परिस्थितीत आता भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी एक पत्र जारी करताना म्हटले आहे की, नवीन कुमार जिंदाल यांनी जातीय सलोखा भडकवणारे विचार सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत. हे भारतीय जनता पक्षाच्या मूळ कल्पनेला विरोध करणारे आहे.
वक्तव्यानंतर कानपुरात हिंसा भडकली
दरम्यान नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत शुक्रवारी कानपूरमध्ये रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान दुकाने बंद करण्याच्या प्रयत्नात दोन समाजाचे लोक एकमेकांना भिडले. एकमेकांवर दगडफेक आणि जाळपोळ केल्याने काही भागात हिंसाचार उसळला. या चकमकींमध्ये अनेक जण जखमी झाले असून, अर्धा डझनहून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. या आतापर्यंत अनेकजणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. देशात सध्या काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरूनही राजकारण तापलं आहे. अशात आता या कारवाईने किमान हे प्रकरण तरी शांत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.