कोण होता गद्दार मीर जाफर? ज्याची तुलना राहुल गांधी यांच्याशी केली जातेय, भाजप नेत्यालाच ‘ते’ वक्तव्य भोवणार?
भारताच्या राजकारणात मीर जाफरशी तुलना नवी नाही. मात्र राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्यावरून त्यांची तुलना मीर जाफरशी केली जातेय, यावरून आता काँग्रेस आक्रमक झाली आहे.
नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीविषयी (Indian Democracy) ब्रिटनमध्ये जाऊन वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देशाची माफी मागावी, यासाठी भाजप नेते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींवर अनेक व्यासपीठांवरून टीका करण्यात येते. संसदेतही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मात्र राहुल गांधींवर आरोप करताना आता भाजप नेताच अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांची तुलना थेट मीर जाफरशी केली आहे. गद्दारीसाठी ओळखला जाणारा मीर जाफर आणि राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा संबंध जोडण्यात आला. यावरून संबित पात्रा यांच्याविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
संबित पात्रा यांचं वक्तव्य काय?
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसला घेरताना भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी मंगळवारी एक वक्तव्य केलंय. राहुल गांधींची तुलना मीर जाफर याच्याशी करण्यात आली. भारतात नवाब बनण्यासाठी राहुल गांधी विदेशी शक्तींची मदत मागण्याकरिता तिकडे गेले होते, असा आरोप संबित पात्रा यांनी केला. संबित पात्रा यांचं हेच वक्तव्य काँग्रेस नेत्यांनी उचलून धरलंय. काँग्रेसनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
गुन्हा दाखल होणार?
संबित पात्रा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र टीका होतेय. राहुल गांधींना मीर जाफर म्हणणाऱ्या संबित पात्रा यांच्यावर आता कायदेशीर कारवाई होणार असं काँग्रेस नेते म्हणतायत. या वक्तव्यावरून लवकरच करारा जवाब मिळेल, असा इशारा देण्यात आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच काँग्रेसशासित राज्यांत संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची तयारी सुरु आहे.
भाजपकडूनच प्रत्युत्तराचे धडे?
संबित पात्रा यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही भाजपकडूनच प्रत्युत्तर द्यायला शिकतोय, असं ते म्हणालेत. पंतप्रदान नरेंद्र मोदींविषयी केलेली वक्तव्यं अनेक काँग्रेस नेत्यांना महागात पडली. सोनिया गांधींनी ‘मौत का सौदागर’, मणिशंकर अय्यर यांनी ‘नीच आदमी’ आदी वक्तव्य केली होती. आता मात्र भाजप अशा वक्तव्यांनी घेरली जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधींना अडकवण्याच्या नादात भाजप नेतेच अडकतात की काय, अशी चर्चा आहे.
मीर जाफर कोण होता?
भारताच्या राजकारणात अनेक नेत्यांना मीर जाफरची उपमा देण्यात आली आहे. बहुतांश वेळा बंडखोरी, गद्दारीसाठी मीर जाफरशी तुलना केली जाते. जयराम रमेश यांनीच गुलाम नबी आझाद तसेच आसामचे मुख्यमत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेस सोडल्यावर त्यांची तुलना मीर जाफरशी केली होती. ममता बॅनर्जी यांनीही सुवेंदु अधिकारी, दिनेश त्रिवेदी, मुकुल रॉय यांनी टीएमसी पक्ष सोडल्यावर त्यांची तुलना मीर जाफरशी केली होती.
एकूणच विश्वासघातकी आणि गद्दारीसाठी मीर जाफर हा शब्द वापरला जातो. मीर जाफर हा १८५७ ते १८६० पर्यंत बंगालचा नवाब होता. त्यापूर्वी तो बंगालचा नवाब सिराजुदौला याचा सेनापती होता. नवाबासोबत गद्दारी करत त्याने इंग्रजांशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे नवाबाला इंग्रजांविरोधात हार पत्करावी लागली. विश्वासघाताच्या बदल्यात मीर जाफरला नवाबाची गादी मिळाली होती. मीर जाफरच्या गद्दारीमुळे सिराजुदौला याला अखेर प्राण गमवावे लागले.