मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)हे मंत्रिमंडळ खातेवाटपापूर्वी उद्यापासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या भेटीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah), भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप नक्की होईल असे सांगण्यात येते आहे. 2014 साली सत्तेत आलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळावर त्यांची मोहोर होती, यावेळी मात्र या नव्या मंत्रिमंडळावर भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची मोहोर असेल असे सांगण्यात येते आहे. देवेंद्र फडणवीसांना फ्री हँड देण्याच्या मूडमध्ये पक्षश्रेष्ठी नसल्याचे सांगण्यात येते आहे. केवळ सरकारच नाही तर प्रदेश भाजपावरही पक्षश्रेष्ठींना त्यांची मजबूत पकड हवी, असे सांगण्यात येते आहे. मंत्रिमंडळ वाटपात शिवसेनेतून आलेल्या किती जणांना, किती अपक्षांना आणि किती भाजपाच्या नेत्यांच्या मंत्रिपदे मिळणार हे पक्षश्रेष्ठींच निश्चित करणार असे मानण्यात येते आहे. मुंबई- ठाणे या विभागांवर आगामी महापालिका आणि विधानसभांच्या दृष्टीने विशेष लक्ष असेल असेही सांगण्यात येते आहे.
ज्या भागात शिवसेनेचं वर्चस्व आहे, जास्त मतदारसंघ आहेत अशा मुंबई, ठाणे भागात भाजपाची पकड मजबूत व्हावी, यासाठी पक्षश्रेष्ठी लक्ष देतील असे सांगण्यात येते आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मदतीने या भागातील शिवसेनेचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. याचा परिणाम भाजपाच्या अंतर्गत राजकारणावरही होण्याची शक्यता आहे.
यापूर्वीच उपमुख्यमंत्री पद पक्षश्रेष्ठींच्या इच्छेने फडणवीसांना स्वीकारावे लागले आहे. त्यांच्या कारकिर्दीत ते आता सर्वोच्च ठिकाणी असताना, पक्षश्रेष्ठींचा हस्तक्षेप वाढल्याचे दिसते आहे. काही जुन्या निष्ठावंतांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालय भाजपाकडे राहिल आणि ते फडणवीसांऐवजी सुधीर मुनगंटीवारांना देण्यात येईल, अशीही चर्चा आहे. ज्यांचे फडणवीसांशी जमत नाही असे काही नेतेही मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईतील भाजपा नेत्यांना अधिक बळ पक्षश्रेष्ठी देतील असेही सांगण्यात येते आहे. काही महिन्यांत मुंबई महापालिका निवडणुका असल्याने ते स्वाभाविकही असेल. अशात मुंबईतील भाजपा आमदारांना मंत्रिपदे देत शिवसेनेला एक संदेश देण्याचा प्रयत्न होईल, अशी शक्यता आहे. आशिष शेलार यांना मोठे मंत्रिपद किंवा प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल असे संकेत मिळत आहेत. मुंबई महापालिकेत अनेक वर्ष नगरसेवक आणि मुंबईतील भाजपा आमदारांचे चांगले संघटन त्यांनी उभे केले असल्याने त्यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. अमित शाहा यांचेही ते नीकटवर्तीय मानले जातात. त्यांच्यासह आता इतर कोणत्या नेत्यांना संधी मिळते, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
दरम्यान मंत्रिमंडळाची यादी निश्चित झाल्यानंतर त्याबाबत दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणे, ही नियमित बाब असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे नेहमीच पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला जात असल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे.