दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करा; ‘आप’ आमदाराच्या मागणीला भाजपचे समर्थन
अगोदरच केंद्र सरकारने विशेष कायद्याद्वारे बहुतांश अधिकार हे नायब राज्यपालांना देऊन ठेवले आहेत. | AAP BJP Delhi Coronavirus
नवी दिल्ली: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिल्लीती यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार शोएब इक्बाल यांनी केली आहे. शोएब इक्बाल हे दिल्लीतील मटिया महाल मतदारसंघाचे आमदार आहेत. (Bring Delhi under President’s rule says AAP MLA Shoaib Iqbal)
शोएब इक्बाल यांची राष्ट्रपातीची राजवटीची मागणी केजरीवाल सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अगोदरच केंद्र सरकारने विशेष कायद्याद्वारे बहुतांश अधिकार हे नायब राज्यपालांना देऊन ठेवले आहेत. त्यामध्ये आता स्वपक्षाच्या आमदाराने राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याने ‘आप’ची आणखीनच कोंडी झाली आहे.
विशेष म्हणजे आता भाजपनेही शोएब इक्बाल यांच्या मागणीचे समर्थन केले आहे. शोएब इक्बाल हे सहावेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. दिल्लीची सद्यस्थिती पाहता त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने केलेली मागणी योग्य आहे. दिल्लीतील आरोग्य यंत्रणा हाताबाहेर गेली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे दिल्लीचा कारभार केंद्र सरकारच्या ताब्यात देण्याची वेळ आली आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे, असे दिल्ली भाजपचे प्रवक्ते हरीश खुराना यांनी म्हटले.
शोएब इक्बाल यांनी काय म्हटले?
दिल्लीत कोणतेच काम धड होत नाही. लोकांचं म्हणणं ऐकायला दिल्लीत कोणीही नाही. दिल्लीत बेड, ऑक्सिजन किंवा औषधं काहीच नाही. त्यामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. दिल्लीत वेळीच राष्ट्रपती राजवट लागू झाली नाही तर रस्त्यांवर मृतदेहांचे सडे पडतील, अशी भीतीही शोएब इक्बाल यांनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या:
काहीही करून ऑक्सिजनचं संकट दूर करा, लोक मरत आहेत; दिल्ली हायकोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश
काळीज पिळवटून टाकणारी घटना, रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलाने बाईकवरुन नेला आईचा मृतदेह
(Bring Delhi under President’s rule says AAP MLA Shoaib Iqbal)