अशी वेळ वैऱ्यावरही नको, रक्षा बंधनाच्या दिवशीच भावाला हृदयविकाराचा तीव्र झटका; निपचित पडलेल्या भावाच्या मनगटावर राखी…
रक्षाबंधनाचा सण सर्व भाऊ-बहिणींसाठी खास असतो. पण हाच दिवस एका बहिणीसाठी काळा दिवस ठरला. या आनंदाच्या सणाच्या दिवशीच एका बहिणीने तिचा प्रिय भाऊ गमावल्याने सर्वच शोकाकुल झाले.
हैदराबाद | 31 ऑगस्ट 2023 : रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) उत्साह देशभरात पहायला मिळतो. या सणाच्या निमित्नाने भाऊ-बहिणीचं प्रेम दृढ होतं. मात्र सणाचा हाच दिवस एका बहिणीसाठी आयुष्यातील अतिशय वाईट,काळा दिवस ठरला. तेलंगण येथील एका महिलेसाठी सणाचा हा दिवस आनंद नाही तर जन्मभराचं दु:ख घेऊन आला. तिथे रक्षाबंधनाच्या दिवशीच महिलेच्या भावाचा हार्ट ॲटॅकने मृत्यू झाला. त्यानंतर शोकाकुल बहिणीने तिच्या भावाच्या मनगटावर अखेरची राखी बांधली. हे दृश्य पाहून तेथे उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.
रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेली घटना तेलंगणामधील पेद्दापल्ली गावातील आहे. तेथे हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्य पाहून सर्वच हबकले. तेथे एका इसमाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बहिणीने मनगटावर राखी बांधली. ते पाहून सर्वांनाच अश्रू अनावर झाले या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओही समोर आला असून तो वेगाने व्हायरल झाला आहे.
तिथे नेमकं काय झालं ?
मिळालेल्या माहितीनुसार, पेद्दापल्ली गावात राहणाऱ्या चौधरी कनकैया नावाच्या इसमाला अचानक हार्ट ॲटॅक आला, ज्यामुळे तो मृत्यूमुखी पडला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घरात एकच गोंधळ माजला. रडून-रडून त्याच्या बहिणीचीही वाईट अवस्था झाली. संपूर्ण कुटुंब शॉकमध्ये होतं.
रडतच तिने बांधली शेवटची राखी
चौधरी कनकैया याचा हार्ट ॲटॅकने मृत्यू झाल्यावर कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या निधनानंतर त्याची छोटी बहीण , भावाच्या मृतदेहाजवळ बसली आणि रडत-रडतच तिने मृत भावाच्या मनगटावर शेवटची राखी बांधली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
संपूर्ण घरात शोककळा परसलेली असतानाच चौधरी कनकैय्याच्या बहिणीने मनगटावर राखी बांधून रडत रडत निरोप दिलाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. यावेळी चौधरी कनकैय्या यांना निरोप देणाऱ्या सर्वांचेच डोळे पाणावले.