मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : भारत आणि बांग्लादेशाच्या सीमेवर बीएसएस ( सीमा सुरक्षा दल ) गुरांच्या तस्करीसह अन्य गुन्हे रोखण्यासाठी एक वेगळा प्रयोग करणार आहे. एका योजनेनुसार भारताचे सीमा सुरक्षा दल आता भारत-बांग्लादेशाच्या सीमेवर मधमाशांचे पालन करणार आहे. या सीमेवर मधमाशांचे पोळे लावल्याने स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी देखील मिळतीय अशी एकंदर योजना आहे. 2 नोव्हेंबरपासून बीएसएफच्या 32 व्या बटालियन मार्फत ही योजना सरु करण्यात आली आहे.
भारत आणि बांग्लादेश मिळून तब्बल 4,096 किलोमीटर लांबीची सीमा आहे. यातील 2,217 किमी लांबीची सीमा पश्चिम बंगालला लागून आहे. सीमीवर मधमाशांचे पालन करण्याच्या योजनेमध्ये केंद्र सरकारचे आयुष मंत्रालयाने देखील सामील झाले आहे. आयुष मंत्रालयाने बीएसएफला मधमाशांची पोळी आणि मिश्र धातूंनी तयार केलेल्या स्मार्ट तारांच्या जाळ्याही दिल्या आहेत. त्यामुळे मधमाशा कशा पाळायच्या याचे तंत्रज्ञान आयुष मंत्रालयाने पुरविले आहे.
या योजनेची कल्पना राबविण्याच्या निर्णय घेणारे 32 व्या बटालियनचे कमाडंट सुजीत कुमार यांनी सांगितले की केंद्राने वायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम ( व्हीव्हीपी ) अंतर्गत ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएफने एक पाऊल पुढे जात फुलांची रोपे पुरविण्याची मागणी आयुष मंत्रालयाकडे केली आहे. या मधमाशांच्या पोळ्यांशेजारी ही फुलझाडे लावण्याची योजना आहे. त्यामुळे मधमाशांना मोठ्या प्रमाणावर परागकण गोळा करून मध तयार करता येईल.
भारत-बांग्लादेशाच्या सीमाभागात मधमाशांची पोळी तयार करण्याच्या योजनेची अमंलबजावणी करण्यास 2 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. मधमाशांची ही पोळी मधमाशा पालन करणाऱ्या स्थानिय शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर असावीत असा केला जात केला आहे. या योजनेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.