राहुल गांधी यांचं भाजपच्या जिव्हारी लागणाऱ्या मुद्द्यांवर बोट, लोकसभेत प्रचंड गदारोळ
अदानींवरुन संसद तहकुबीचं सत्र अखेर 4 दिवसानंतर थांबलं. राहुल गांधींनी अदानी समुहावरुन सरकारबद्दल होणाऱ्या चर्चा सभागृहात मांडल्या आणि त्यावरुन सरकारला निशाणा बनवलं.
नवी दिल्ली : गौतम अदानी यांच्यावरुन राहुल गांधी यांनी आज सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. देशातच नव्हे तर देशाबाहेरही केंद्र सरकारच्या मदतीनं अदानींना कंत्राटं मिळाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. त्यावर भाजपकडून काय उत्तर आलं. राहुल गांधींनी काय आरोप केले. पाहूयात हा रिपोर्ट.
अदानींवरुन संसद तहकुबीचं सत्र अखेर 4 दिवसानंतर थांबलं. राहुल गांधींनी अदानी समुहावरुन सरकारबद्दल होणाऱ्या चर्चा सभागृहात मांडल्या आणि त्यावरुन सरकारला निशाणा बनवलं.
अग्निवीर योजनेचा प्रस्ताव हा सैन्यामधून नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आल्याचा दावा राहुल गांधींनी एका अधिकाऱ्याचा दाखला देत केलाय.
भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राहुल गांधींमध्ये सवाल-जबावही रंगला. राहुल गांधींनी भाजप खासदारांना टोला मारत भाषणं संपवलं. त्यानंतर भाषण चांगलं झालं म्हणून काही खासदार राहुल गांधींकडे गेले आणि काँग्रेसनं भारत जोडोच्या घोषणा देताच त्याला लोकसभाध्यक्षांनी उत्तर दिलं.
राहुल गांधींचं भाषण तुरळक अडथळे वगळता पूर्ण झालं. त्यामुळे आता बाहेर जाऊन लोकसभाध्यक्ष माईक बंद करतात, असं न बोलण्याचं आवाहन ओम बिर्लांनी राहुल गांधींना केलं. शेवटी तुमच्या भावनांचा आदर आहे, असं म्हणत हा विषय थांबला.
तूर्तास राहुल गांधींनी पुराव्यांअभावी आरोप केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय. त्यामुळे हा मुद्दा अजून बराच काळ गाजण्याची चिन्हं आहेत.