राजस्थानच्या सीएमच्या ताफ्यात घुसली रॉन्ग साईडने येणारी कार, सात पोलिसांसह नऊ जण जखमी
रॉन्ग साईडने येणाऱ्या कारमुळे अनेकदा जीवघेणे अपघात झालेले आहेत. आता राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना रॉन्ग साईडने अचानक कार घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. या घटनेत सात पोलिसांसह नऊ जण जखमी झाले आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांच्या कारच्या ताफ्यात एक रॉन्ग साईडने येणारी कार घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारच्या जोरदार धडकेने पोलिसांसह नऊ जण जखमी झाले असून सुदैवाने मुख्यमंत्री भजनलाल यांना काही झालेले नाही. त्यांनी स्वत:च या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात जयपूरातील जगतपुरा एनआरआय सर्कल जवळ घडला आहे. येथून मुख्यमंत्री भजनलाल यांच्या गाड्यांच्या ताफा जात असताना अचानक रॉन्ग साईडने एक कार ताफ्यात घुसली आणि तिने अनेकांना कारना धडक दिली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की रॉंन्ग साईडने येणाऱ्या या कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.या अपघातात सात पोलिसासह नऊ जण जखमी झाले आहेत. या कारमधील दोन जण जखमी झाले आहेत.
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी प्रवासापूर्वी इतर वाहनांसाठी रस्ता बंद केला नव्हता म्हणून हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. वास्तविक सीएम भजनलाल यांनी व्हिआयपी रुट लाईन घेण्यास मनाई केली होती. त्यांच्या ताफ्याने सर्वसामान्य लोकांना त्रास नको म्हणून त्यांनी असे केले होते.त्यामुळे सर्वसामान्य वाहनांची वर्दळ सुरुच होती. आणि त्यातूनच सीएमनी आपला ताफा काढला होता.
मुख्यमंत्र्यांनी जखमींना रुग्णालयात नेले
रॉन्गसाईडने आलेल्या कारने टक्कर मारल्यानंतर सीएम भजनलाल कारमधून उतरले आणि त्यांनी जखमीची विचारपूस करीत काळजी घेतली, त्याच्या ताफ्यातील सात पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. तसेच टक्कर मारणाऱ्या कारमधील दोन जण जखमी झाले होते. यावेळी सीएम भजनलाल यांनी गंभीर जखमींना तातडीने आपल्या सोबत रुग्णालयात नेले आणि भरती केले.
पोलीसांचा तपास सुरु
या अपघातानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी संबंधित कारला ताब्यात घेतले आहे. या कारचा चालक देखील जखमी झाला आहे. पोलिस आता या प्रकरणात चूक कशी झाली याचा तपास करीत आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी सीएमचा ताफा जात असताना सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून स्वतंत्र मार्गिका करण्यास मनाई केली होती. त्यामुळे सर्वसामान्य कारना थांबविण्यात आलेले नव्हते. त्यामुळे रॉन्ग साई़डने येणाऱ्या कारने धडक मारल्याचे उघड झाले आहे.