नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री जगदीश टायटलर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. 1984 शीख दंगली प्रकरणात सीबीआयने टायटलर यांच्या विरोधात शनिवारी आरोपपत्र दाखल केले आहे. जगदीश यांच्या विरोधात जमावाला उकसवणे, भडकविणे, दंगली पेटविणे तसेच सामाजिक सलोखा बिघडवण्यासारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एक दिवसांनी पुल बंगश परिसरात गुरूद्वारात आग लावून तिघा शिखांची हत्या केल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
सीबीआयने एका विशेष कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की 1984 च्या दंगलीत पुल बंगश गुरुद्वारा आझाद मार्केट परिसरात जमलेल्या जमावाला आपल्या त्वेषपूर्ण भाषणातून जगदीश टायटलर यांनी उकसवले आणि भडकवल्याने संतप्त जमावाने गुरूद्वाराला पेटवले. या हिंसाचारात ठाकूर सिंह, बादल सिंह आणि गुरू चरण सिंह यांची हत्या केली गेली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की सीबीआयने टायटलर याच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता ( आयपीसी ) कलम 147 ( दंगल ) 109 ( भडकविणे ) आणि 302 ( हत्या ) आदी कलमांनुसार जगदीश टायटलर यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. कोर्ट आता 2 जूनला पुढील सुनावणी ठेवली असून या आरोपाची निश्तितीच्या प्रक्रियेला त्या दिवसापासून सुरूवात होईल असे म्हटले जात आहे.
टायटलर यांनी केलेल्या भाषणाचा पुरावा म्हणून त्यांच्या आवाजाचे नमूने गेल्या महिन्यात सीएफएसएल लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. त्यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले होते की आम्हाला 39 वर्षे जुन्या या प्रकरणात नविन पुरावे मिळाले आहेत. त्यानंतर जगदीश यांच्या आवाजाचे नमूने जुळविण्यात येणार आहेत. कोणत्याही व्यक्तीचा आवाज अनेक वर्षांनंतरही तसाच राहतो. केवळ तब्येत बिघडल्याने जर घशातील स्वरतंतू किंवा ध्वनिरज्जूंना इजा पोहोचली असेल तरच आवाजात फरक पडतो अन्यथा आवाजात सहसा बदल होत नाही. 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केल्यानंतर शीख समाजावर दिल्ली आणि अन्य भागात हल्ले झाले होते.