पाटणा: राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांच्या कन्येविरोधात सीबीआयने (CBI) भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित दिल्ली आणि बिहारमधील तब्बल 17 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. आरआरबीमध्ये झालेल्या धांदली प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2004 ते 2009 पर्यंत लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री होते. लालूंच्या काळात झालेल्या नोकरभरतीमध्ये कथितरित्या अनियमितता ठेवल्याचा ठपका ठेवून सीबीआयने लालू आणि त्यांची कन्या मिसा भारतीविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला आहे (CBI Raid at Lalu Yadav Locations). याच प्रकरणात सीबीआयची छापेमारी सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लालूप्रसाद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात जवळकी वाढली आहे. नितीशकुमार केव्हाही भाजपची साथ सोडून लालूंसोबत आघाडी करण्याची स्थिती आहे. त्यामुळेच लालूंवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पटना येथील निवासस्थानीही छापेमारी करण्यात आली आहे. पटनासह गोपालगंज येथेही लालूप्रसाद यादव यांच्या वडिलोपर्जित घरावर छापेमारी करण्यात आली आहे. दिल्लीत लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती यांच्या घरावरही सीबीआयने छापेमारी केली आहे. याच ठिकाणी लालूंचंही घर असल्याचं सीबीआयने स्पष्ट केलं. दिल्ली, पटना आणि मध्यप्रदेशातली भोपाळमध्येही छापेमारी करण्यात आली आहे.
जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याचं हे प्रकरण असल्याचं सीबीआयने स्पष्ट केलं आहे. लालूप्रसाद यादव हे केंद्रीय मंत्री असताना त्यांनी लोकांच्या जमिनी घेऊन त्यांना नोकऱ्या दिल्या असा त्यांच्यावर आरोप आहे. आज पहाटे 6.30 वाजता सीबीआयची टीम राबडी देवी यांच्या निवासस्थानी पोहोचली. मात्र, सीबीआयच्या टीमला आतमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना एक एक करून राबडी देवी यांच्या घरात जावं लागलं. सकाळी पावणे नऊ वाजता एक महिला अधिकारी राबडी देवी यांच्या घरात पोहोचली.
ही महिला अधिकारी राबडी देवींची चौकशी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. लालू प्रसाद यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी करणं म्हणजे राज्यातील बुलंद आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे. हा आवाज चिरडण्याचा प्रयत्न आहे. ही कारवाई पक्षपातीपणे करण्यात येत आहे, असं राजदचे प्रवक्ते आलोक मेहता यांनी सांगितलं.