‘बिपिन रावत यांची अपूर्व सेवा भारत कधीही विसरणार नाही’, पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली अर्पण, राष्ट्रपती, संरक्षणमंत्र्यांकडूनही आदरांजली

| Updated on: Dec 08, 2021 | 7:14 PM

बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. रावत यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच सर्व मृतांच्या कुटुंबियांप्रति आपल्या संवेदना प्रकट केल्या आहेत.

बिपिन रावत यांची अपूर्व सेवा भारत कधीही विसरणार नाही, पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली अर्पण, राष्ट्रपती, संरक्षणमंत्र्यांकडूनही आदरांजली
सीडीएस जनरल बिपीन रावत यांना पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली अर्पण
Follow us on

मुंबई : तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात (Helicopter Accident) अखेर सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तशी माहिती संरक्षण दलाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) आणि अन्य 11 लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. रावत यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच सर्व मृतांच्या कुटुंबियांप्रति आपल्या संवेदना प्रकट केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली

‘जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. एक सच्चा देशभक्त, त्यांनी आपले सशस्त्र दल आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यातं मोठं योगदान दिलं आहे. सामरिक बाबींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन अपवादात्मक होते. त्यांच्या निधनामुळे मला खूप दु:ख झाले आहे. ओम शांती. भारताचे पहिले सीडीसएस म्हणून जनरल रावत यांनी संरक्षण सुधारणांसह आपल्या सशस्त्र दलांशी संबंधित अनेक पैलूंवर काम केलं. सैन्यात सेवेचा समृद्ध अनुभव त्यांच्यासोबत होता. त्यांची अपूर्व सेवा भारत देश कधीही विसरणार नाही’, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

देशाने आपला एक शूर पुत्र गमावला – राष्ट्रपती

‘जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिकाजी यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला आहे. देशाने आपला एक शूर पुत्र गमावला आहे. मातृभूमीसाठी त्यांची चार दशके नि:स्वार्थ सेवा, अपवादात्मक शौर्य आणि पराक्रमाने चिन्हांकित होती. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल जाणून घेणे माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे. शोकाकुल कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना’, अशा शब्दात राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

देशाचे कधीही भरुन न येणारे नुकसान- राजनाथ सिंह

‘तामिळनाडूत झालेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातात सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 सशस्त्र दलाच्या जवानांच्या आकस्मिक निधनामुळे खूप दु:ख झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे संरक्षण दलाचे आणि देशाचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. जनरल रावत यांनी धैर्य आणि अथक परिश्रम घेत देशाची सेवा केली होती. सीडीएसच्या रुपात यांनी आमच्या संरक्षण दलांच्या संयुक्ततेसाठी योजना तयार केल्या होत्या’.

‘या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. सध्या वेलिंग्टन मिलिटरी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंग लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतोट, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी रावत आणि अन्य मृत अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण

‘सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आणि दु:ख झाले. त्यांची कारकीर्द अतिशय उत्कृष्ट होती आणि गेल्या चार दशकांतील त्यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना’, असं ट्विट करत शरद पवार यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त

भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते पण शेवटी ती  दुर्दैवी बातमी आलीच. अनेक आघाड्यांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणाऱ्या संरक्षण दलाच्या प्रमुखांचा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत असा मृत्यू होणं नियतीलाही मान्य असणार नाही. मी जनरल रावत आणि त्यांची पत्नी तसेच अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळं खूप व्यथित झालो आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे. ही दुर्घटना अत्यंत विषण्ण करणारी, दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.

आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारताचे संरक्षण दल हे सुसज्ज आणि बलशाली आहे. या तीनही दलांचे असे संयुक्त प्रमुखपद भूषवण्याचा पहिला गौरवही दिवंगत जनरल रावत यांना मिळाला. त्यांची कारकिर्दही त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि पदाला साजेशीच अशी होती. संरक्षण दलाला तडफदार आणि सर्व आघाड्यांवर ठसा उमटविलेल्या अनुभवी असे नेतृत्व मिळाल्याने आपल्या तीनही दलांचे मनोबल उंचावले होते,  त्याचे प्रत्यंतरही अलिकडच्या तीनही दलांच्या कामगिरीतून दिसत होते. दुर्घटनेत दिवंगत रावत यांच्या पत्नीसह सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ब्रिगेडीयर आणि लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही अंत झाला आहे, हे अत्यंत दुःखद आहे. सुरक्षेतील कुशल, अनुभवी आणि धडाडीचे नेतृत्व गमावणे हे देशाच्या दृष्टीने मोठे नुकसान आहे. एकंदर दुर्घटनाच सबंध देशासह आपल्या सर्वांचे मन विषण्ण करणारी आहे. या सर्व शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रावत यांच्यासह मृत अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

CDS Bipin Rawat Death News: … आणि देशाचा श्वास थांबला; हेलिकॉप्टर दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख, सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू

Bipin Rawat Helicopter crash : कोण होते सीडीएस जनरल बिपिन रावत? जाणून घ्या रावत यांचा लष्करातील संपूर्ण प्रवास