Chandrayaan-3 : इतके पृथ्वीवासी झाले जमिनीचे मालक! चंद्रच नाही तर इतर ग्रहांवर पण खरेदी केले प्लॉट
Chandrayaan-3 : चंद्रयान-3 च्या यशावर खूष होऊन जम्मू आणि काश्मीर मधील उद्योजक रुपेश मैसन यांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. ज्या भागात त्यांनी जमीन खरेदी केली, त्याला आनंदाचा झरा असे म्हणतात. 25 ऑगस्ट रोजी त्यांच्या नावावर रजिस्ट्री झाली आहे.
नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : चंद्रयान-3 च्या (Chandrayaan-3) यशाने भारताने सर्व जगाला सूखद धक्का दिला. सॉफ्ट लँडिंग करुन भारताने पराक्रम केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ही अवघड कामगिरी करणारा भारत जगातील पहिला देश ठरला. भारतातील प्रत्येक नागरिकाने हा आनंद साजरा केला. प्रत्येकाच्या भावना उंचबळून आल्या. जगभरातून भारतावर कौतुकाचा वर्षाव झाला. आता प्रत्येक जण हा आनंद त्याच्या पद्धतीने साजरा करत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील उद्योजक रुपेश मैसन यांनी चंद्रावर जमीन खरेदी (Register Land On Moon) करुन आनंद साजरा केला. त्यांनी ज्या भागात जमीन खरेदी केली, त्या परिसराला आनंदाचा झरा, असे म्हणतात. मानवाने केवळ चंद्रावरच जमीन खरेदी केली आहे, असे नाही. पृथ्वीवासीयांनी इतर ग्रहांवर पण प्लॉटचे बुकिंग केले आहे.
आज आनंदी आनंद
49 वर्षीय मैसन हे जम्मू आणि काश्मीरच्या लेह येथील युसीएमएएसचे विभागीय संचालक आहेत. त्यांनी चंद्रावर जमीन खरेदी केल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार, त्यांनी चंद्रावर ट्रॅक्ट55-पार्सल 10772, येथील आनंदाचा झरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात हा प्लॉट खरेदी केला आहे.
25 ऑगस्ट रोजी मिळाली रजिस्ट्री
मॅसन यांनी न्यूयॉर्क शहरातील द लूनर रजिस्ट्रीमधून जमीन खरेदी केली. 25 ऑगस्ट रोजी त्यांचे नावे जमीन करण्यात आली. मीडियाला त्यांनी या जमीन खरेदीबाबत माहिती दिली. चंद्रावर भविष्यातील अनेक आशेचे प्रतिक आहे. भविष्यात चंद्रावर मानवाची वस्ती झाली तर त्यादृष्टीने हे मोठं पाऊल असेल.
675 पृथ्वीवासीयांकडे दुसऱ्या ग्रहावरील जमीन
जगातील काही लोक विज्ञानाच्या बळावर इतर ग्रहांवर वस्तीचे स्वप्न रंगवत आहे. येत्या काही वर्षात कृत्रिमरित्या या ग्रहावर मानवी वस्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चंद्रावरच नाही तर इतरही ग्रहांवर दिग्गजांनी जमीन खरेदी केली आहे. आतापर्यंत 675 जणांनी इतर ग्रहांवर जमीन खरेदी केली आहे. यामध्ये अमेरिकेतील तीन पूर्व राष्ट्राध्यक्षांचा समावेश आहे.
इतक्या अंतराळवीरांची वसाहत
2030 पर्यंत चंद्रावर 40 तर पुढील 10 वर्षांत, 2040 पर्यंत एक हजारांहून अधिक अंतराळवीर चंद्रावर वस्ती करतील. त्यांची चंद्रावर वसाहत असेल. पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवात जसे संशोधन सुरु आहे. तसेच संशोधन प्रकल्प तिथे सुरु होतील. मानवी वसाहतीच्या दृष्टीने पाणी गवसल्यास मोठा फायदा होईल.
कशी होते जमिनीची खरेदी?
चंद्रावर जमीन खरेदीसाठी लूना सोसायटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लूरन लँड्स रजिस्ट्रीद्वारे जमीन खरेदी करता येते. या नियमानुसार, चंद्रावर कमीत कमी एक एकर जमीन खरेदी करता येऊ शकते. त्यासाठी 37.50 अमेरिकन डॉलर म्हणजे 3112.52 रुपयांचा खर्च येतो.