Chandrayaan-3 update | भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करणारा पहीला देश ठरणार, 23 ऑगस्टला सायं. 6.04 वाजता लॅंडींग
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी ( इस्रो ) दोन दिवसांनी ऐतिहासिक दिवस उजाडणार आहे. रशियाचा दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरविण्याचा प्रयत्न फसल्याने भारताला आता नवा विक्रम करीत पहीला देश बनण्याची संधी चालून आली आहे.
बंगळुरु | 20 ऑगस्ट 2023 : एकीकडे भारताआधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करण्याचे रशियाचं स्वप्न लूना-25 यान भरकटल्याने भंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच भारताचे चंद्रयान-3 मात्र एक- एक टप्पे सुरळीत पार पाडत येत्या 23 ऑगस्टच्या सायंकाळी 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करण्यासाठी संपूर्ण सज्ज झाल्याचे इस्रोने जाहीर केले आहे. आता भारताची ही मोहीम सफल झाली तर कोणताच देश न पोहचलेल्या चंद्राच्या ‘डार्क साईट’ म्हणजे दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा जगातला पहिला देश ठरणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी ( इस्रो ) दोन दिवसांनी ऐतिहासिक दिवस उजाडणार आहे. भारताचे महत्वाकांक्षी चंद्रयान-3 येत्या 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. इस्रोने भारतीयांना या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी हा इव्हेंट लाईव्ह दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीयांना इस्रोच्या वेबसाईटवर, इस्रोच्या अधिकृत युट्यूब चॅनल, इस्रोच्या फेसबुक पेज आणि डीडी नॅशनल चॅनलवरही सायंकाळी 5.27 वा. बुधवारी याचे थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे.
चंद्रयान-3 चंद्रावर 23 ऑगस्टला सायं. 6.04 वाजता लॅंडींग करणार इस्रो ट्वीटरवर दिली माहीती –
Chandrayaan-3 Mission:
🇮🇳Chandrayaan-3 is set to land on the moon 🌖on August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.
Thanks for the wishes and positivity!
Let’s continue experiencing the journey together as the action unfolds LIVE at: ISRO Website https://t.co/osrHMk7MZL YouTube… pic.twitter.com/zyu1sdVpoE
— ISRO (@isro) August 20, 2023
चंद्राच्या 25 किमी जवळ गेले
चंद्रयानच्या विक्रम लॅंडर मॉड्यूलने दुसरे आणि अंतिम डीबूस्टींग पूर्ण केल्याचे इस्रोने जाहीर केले आहे. आता चंद्रयान-3 चंद्राच्या आणखीन जवळ गेले असून आता चंद्राच्या किमान 25 किमी तर कमाल 134 किमी कक्षेत परिभ्रमण करणार आहे. चंद्रयानाच्या प्रॉपल्शन मॉड्यूल पासून लॅंडर मॉड्यूल वेगळे झाल्यानंतर 18 ऑगस्ट रोजी पहिले डीबूस्टींग करीत कक्षा घटविली होती. तेव्हा ते चंद्राच्या 113 किमी बाय 157 किमी अंडाकार कक्षेत चंद्राच्या परिभ्रमण करीत होते.
सुर्योदयाची वाट पाहणार
चंद्रावरचा एक दिवस पृथ्वीच्या 14 दिवसाच्या बरोबरीचा असतो. आता चंद्रावर रात्र सुरु असून 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सुर्वोदय होणार आहे. विक्रम लॅंडर चंद्राच्या पृष्टभागावर सूर्याच्या प्रकाशात लॅंडींग करण्याचा प्रयत्न करणार आहे. विक्रम लॅंडरच्या आतील रोव्हर योग्य प्रकारे काम करण्यासाठी सूर्य प्रकाशाची गरज आहे. चंद्रयान-3 मोहिमेचा उद्देश्य येथे पाणी आहे का ? याचा शोध घेणे तसेच तेथील वातावरणाचा आणि खनिजांचा शोध घेणार आहे.