नवी दिल्ली : चांद्रयान 3 च्या यशासाठी प्रत्येक जण प्रार्थना करतोय. 23 ऑगस्टला चांद्रयान 3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्याआधी इस्रोने सर्व तयारी पूर्ण केलीय. 17 ऑगस्टपासून चांद्रयान 3 लँडिंगशी संबंधित आपली अंतिम प्रक्रिया सुरु करेल. त्य़ानंतर चंद्राच्या कक्षेतील प्रत्येक घडामोड महत्त्वाची असेल. इस्रोचे माजी प्रमुख के. सिवन यांनी एक वक्तव्य केलय. त्यामुळे प्रत्येक देशवासियाचा विश्वास आणखी वाढणार आहे. चांद्रयान-3 यशस्वी होणार, याची आपल्याला पूर्ण खात्री आहे, असं के.सिवन यांनी सांगितलं.
इस्रोच्या माजी प्रमुखांनी काय सांगितलं?
के.सिवन चांद्रयान-2 मिशनच्यावेळी इस्रोचे प्रमुख होते. 23 ऑगस्टची आपण सगळे वाट बघतोय. चांद्रयान-2 ने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. पण लँडिंगच्यावेळी एक समस्या आली, त्यामुळे मिशन यशस्वी होऊ शकलं नाही. लँडिंगबद्दल मनात चिंता जरुर आहे, पण मिशन यशस्वी होणार, याची मला खात्री आहे. कारण मागच्या काही चूकांमधून आपण धडा घेतला आहे, असं सिवन म्हणाले.
लँडिंगची मार्जिन वाढवली
आम्ही लँडिंगची मार्जिन वाढवली आहे, असं सिवन म्हणाले. 17 ऑगस्टला होणारी प्रक्रिया खूप महत्त्वाची असेल. चांद्रयान -3 ची दोन भागांमध्ये विभागणी होईल. यात एक प्रॉपल्शन मॉड्युल आणि दुसरं लँडर मॉड्युल आहे.
लँडिंग मॉड्युलला कुठल्या रेंजमध्ये आणणार?
चांद्रयान -3 साठी चांद्रयान-2 चं नाही, तर चांद्रयान-1मिशनच नेतृत्व करणारे डॉ. एम. अन्नादुरई यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रॉपल्शन मॉड्युल आणि लँडर मॉड्युल सेप्रेट होतील, तेव्हा लँडरच्या हालचालींचा अभ्यास केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. 4 थ्रस्टरची वारंवार तपासणी होईल. अखेरीस लँडिंग मॉड्युलला 100*30 KM च्या रेंजमध्ये स्थापित केलं जाईल.
चांद्रयान-2 पासून धडा घेत चांद्रयान-3 मध्ये काय बदल केले?
चांद्रयान-2 च्या अपयशातून इस्रोने बरच काही शिकलं आहे. चांद्रयान-3 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. चांद्रयान-3 लँडिंग मॉड्युलमध्ये बऱ्याच गोष्टी जोडण्यात आल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत चंद्रावर उतरण्याइतपत विक्रम लँडरला सक्षम बनवण्यात आलं आहे. चांद्रयान 3 मिशनला 14 जुलै रोजी सुरुवात झाली होती. 5 ऑगस्टला चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. 16 ऑगस्टला फायनल मॅन्यूव्हर पूर्ण झालं. 17 ते 23 ऑगस्ट दरम्यान लँडिंगशी संबंधित अंतिम प्रोसेस होईल.