रेल्वे सुरक्षा साखळी खेचण्याआधी नियम पाहून घ्या, रेल्वेने दिली माहीती
रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षा साखळी प्रवाशांना आपात्कालिन मदतीसाठी प्रत्येक डब्यात उपलब्ध केलेली असते. परंतू याचा गैरवापरच जास्त होताना दिसतो. त्यामुळे नेमका रेल्वेचा नियम काय आहे ते पाहूयात...
मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : रेल्वेतून रोजचा प्रवास करताना आपणाला रेल्वेचे प्रत्येक नियम माहीती असतात असे नाही. रेल्वेच्या प्रवासात कधी तुम्हाला असुरक्षित वाटले किंवा ट्रेन थांबवायची असेल तर सुरक्षा साखळी खेचून ट्रेन थांबविता येते. परंतू त्यासाठी सबळ कारण आपणाकडे असायला हवे, कारण विनाकारण सुरक्षा चेन खेचल्यास आपल्याला शिक्षा होऊ शकते ? याबाबत रेल्वेचे नियम काय आहेत याची तुम्हाला माहीती प्रत्येकाला असायला हवी. चला पाहूया कोणत्यावेळी सुरक्षा चेन खेचण्याची मूभा असते. याबाबत नेमका काय नियम आहे ?
अनेक वेळा प्रवासी ट्रेनची चेन खेचून ती थांबवितात आणि पळतात. परंतू पोलिस अशा व्यक्तीला सीसीटीव्ही आणि इतर साधनांद्वारे शोधून काढू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तीने जर विनाकारण सुरक्षा साखळी खेचली असेल तर त्याच्यावर रेल्वेच्या नियमानूसार कठोर कारवाई होऊ शकते.
रेल्वेला कसे समजते ?
जेव्हा एखाद्या ट्रेनच्या डब्यातील प्रवासी चेन पुलींग करतो. तेव्हा त्या डब्याच्या वरच्या कोपऱ्यातील एक भाग बाहेर येतो. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना कोणत्या डब्यातून चेन पुलींग झाली आहे ते समजते. त्याआधारे रेल्वे पोलिस डब्यात येऊन चौकशी करतात.
चेन खेचल्यानंतर येतो प्रेशरचा आवाज
जेव्हा एखाद्या डब्यातून प्रवासी चेन पुलींग करतात तेव्हा त्या डब्यातून प्रेशर लिक झाल्याचा आवाज होतो. त्यामुळे ट्रेन थांबते. त्यानंतर ट्रेनच्या डब्यात पोलिस येऊन चौकशी करतात. ट्रेनमधील प्रवाशांना काय मदत हवी विचारतात. चेन खेचण्याचे कारण विचारतात? आणि पुढील निर्णय घेतात.
केव्हा चेन खेचता येते ?
रेल्वेच्या नियमानूसार केवळ आपात्कालिन प्रसंगी ट्रेनची चेन खेचण्याची मूभा आहे. जर आपण ट्रेनमध्ये नातेवाईकाला सोडायला आलो आणि ट्रेनमध्ये त्याचे सामान ठेवण्यासाठी आत गेलो आणि अचानक ट्रेन सुटली तर तिला थांबविणे किंवा कुटुंबातील कोणी सदस्य फलाटावरच राहीला आणि ट्रेन सुटली तर तिला थांबविणे याकारणासाठी ट्रेनची साखळी खेचता येणार नाही. जर प्रवासात कोणाला इजा झाली वैद्यकीय मदत हवी असेल किंवा अपघात घडला तरच चेन खेचायला परवानगी आहे.
रेल्वे या प्रकरणात काय शिक्षा देते
रेल्वे कायद्यानूसार जर कोणा प्रवाशाने ट्रेनची सुरक्षा साखळी विनाकारण खेचली असेल तर ट्रेन थांबविणाऱ्या व्यक्तीला रेल्वे अधिनियम 1989 च्या कलम 141 अंतर्गत कारवाई करते. अशा प्रकरणात दोषी आढळणाऱ्यास 1000 रुपये दंडाची किंवा एक वर्षांच्या कारावासाची शिक्षा असते. किंवा काही प्रकरणात दोन्ही शिक्षा एकत्र देखील होऊ शकतात.