नवी दिल्ली | 8 ऑक्टोबर 2023 : तर श्रीमंत होण्याचे कोणाचे स्वप्न नसते राव? प्रत्येकाला वाटतं एखादा खजिना गवसावा. काही जण तर हटकून आठवड्यातील शुभ दिवशी लॉटरीचं तिकीट काढतात. पण प्रत्येकाचं नशीब फळफळतंच असं नाही. बोटावर मोजण्याइतके काही माणसं या मार्गाने करोडपती झाल्याचे समोर येते. सध्या ऑनलाईन व्यवहार वाढल्याने काही तांत्रिक चुका मानवी आयुष्यात सुखद धक्का देतात. चेन्नईतील (Chennai Crorepati) एका मेडिकलवर काम करणाऱ्या व्यक्तीला असाच सुखद धक्का काही काळ अनुभवता आला. त्याच्या खात्यात 753 कोटी रुपये जमा झाल्याने त्याला आकाश ठेंगणे झाले. काही वेळासाठी तो गर्भश्रीमंत, नवकोट नारायण झाला.
असा झाला नवकोट नारायण
चेन्नईतील एका मेडिकलवर मोहम्मद इद्रिस हा काम करतो. तो मुळचा करणकोविल येथील रहिवाशी आहे. चेन्नईतील तेनामापेठ येथील मेडिकलवर तो काम करतो. 7 ऑक्टोबर रोजी त्याच्या एका मित्राने दोन हजारांची मदत मागितली. इद्रिसने मित्राच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले. कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातून त्याने मित्राला ही मदत केली. पण आता आपल्या खात्यात किती रक्कम उरली आहे हे तपासण्यासाठी त्याने बँक बॅलेन्स तपासले. तर त्याच्या खात्यात 753 कोटी रुपये शिल्लक असल्याचे दिसले.
इद्रिसला प्रामाणिकपणाचा फटका
मोहम्मद इद्रिसला इतका पैसा खात्यात आल्याने दुसराच संशय आला. नाहक कोणत्याच वादात अडकण्यापेक्षा त्याने अगोदर ही माहिती त्याच्या बँक शाखेला कळवली. या प्रकाराने बँक अधिकारी पण चक्रावले. तांत्रिक चुकीमुळे त्याच्या खात्यात भलीमोठी रक्कम आल्याचे सांगत बँकेने इद्रिसचेच खाते गोठवले.
तामिळनाडूमध्ये पुन्हा कोट्याधीश
तामिळनाडूमध्ये तांत्रिक चुकांमुळे काही जण कोट्याधीश झाले आहेत. अशा चुका वारंवार होत असल्याचे समोर आले आहे. अशी घटना नुकतीच घडली होती. चेन्नई येथील कॅब चालक राजकुमार याला तामिळनाडू मर्कंटाईल बँकेने असेच करोडपती केले होते. त्याच्या खात्यात थेट 9000 कोटी रुपये जमा झाले होते. हा आनंदाचा धक्का पचवणे राजकुमारला किती अवघड गेले असेल हे त्या बिचाऱ्यालाच माहिती आहे. तंजावर येथील गणेशन याच्याबाबतीत ही अशीच घटना घडली होती. त्याच्या खात्यात पण कोट्यावधी रुपये जमा झाले होते. त्याच्या खात्यात 756 कोटी रुपये बँकेने जमा केले होते.