इंडिया शब्द बदलून भारत करणार असेल, तर काही चुकीचं नाही – छत्रपती संभाजीराजे
Maratha reservation : मराठा आरक्षणाबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली. मराठा समाजाला आरक्षण मिळेल, पण त्यासाठी काय कराव लागेल? ते छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आंदोलनाचा विषय पेटला आहे. मागच्या आठवड्यात जालना येथे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यात आंदोलन सुरु आहेत. बंद पुकारण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी जालना येथे जाऊन मुख्य आंदोलक मनोज जरांडे पाटील यांची भेट घेतली. मराठा आंदोलनात सुरुवातीपासून सक्रीय असणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी या विषयावर आपलं मत मांडलय. “मनोज पाटील यांच्या आंदोलनाला मी अनेकदा भेट दिली आहे. त्यांच्या मागण्यासंदर्भात मराठा समाजाची जी भूमिका असेल ती माझी असेल, सरकारच्या समितीला मी काही मुद्दे सुचवले होते” असं संभाजी राजे म्हणाले.
“तुम्हाला आरक्षण मिळावायचे असेल, तर वेगवेगळे पॅरामीटर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला मागास म्हटलेलं नाही. पहिल्यांदा मराठा समाजाला आयोगाने मागास ठरवायला हवं. इंडिया शब्द बदलून भारत करणार असेल, तर काही चुकीचं नाही” असं संभाजीराज म्हणाले. “दुर्गम आणि दुर्बल भागातील लोकांना 50 टक्क्याच्यावर आरक्षण देता येते. अन्यथा केंद्राला बदल करावा लागेल. क्युरेटीव्ह पिटीशन अगोदरच टाकायला हवं होतं. हा राज्याचा प्रश्न आहे. निजामाने मराठ्यांना कुणबी केलं होते. मराठवाड्यातल्या कुणब्यांना आरक्षण द्यावं” अशी जरांडे यांची मागणी आहे.
‘जरांडे पाटील यांची प्रकृती खालावली’
“राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलायला हवी, मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला होता. जरांडे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. या अगोदर मराठा समाजातील 40 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत” असं संभाजीराजे म्हणाले. मनोज जरांडे पाटील यांनी आपल उपोषण मागे घ्याव, यासाठी राज्य सरकारची समिती त्यांची भेट घेणार आहे. मनोज जरांडे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही, तर आज संध्याकाळी 5 वाजल्यानंतर ते पाण्याचा त्याग करणार आहेत. मनोज जरांडे पाटील यांनी चर्चा करणार, चर्चेतूनच मार्ग निघणार असं म्हटलं आहे. अध्यादेश काढण एकादिवसात शक्य आहे, असं त्यांचं मत आहे.