साड्यांच्या शोरुममध्ये चक्क गादीवर बसते गोमाता, तिचे नाव पडले ॲप्पलवाली गाय
कापड मार्केटमधील एका साडी शोरुममध्ये एक गाय रोज नेमाने दुकानात येते. दुकानातील गादीवर बसते. गेली सात वर्षे हा सिलसिला कायम आहे.
रायपूर | 8 सप्टेंबर 2023 : छत्तीसगडची रायपूर येथील सर्वात मोठ्या कापड मार्केटमध्ये एका साड्यांच्या शोरुममध्ये एक गाय नेमाने येत आहे. या गायीचा रोज नेमाने या दुकानात येण्याचा सिलसिला गेल्या सात वर्षांपासून सुरु आहे. ही गाय बिनधास्त आपल्या शिंगांनी शोरुमचा काचेचा दरवाजा उघडते आणि तेथील गादीवर जाऊन आरामात बसते. तिच्या दर्शनाने दुकानाचे मालक मात्र खुपच आनंदीत होतात. आणि तिचा रोज आशीवार्द घेतात. या गायीवर गोसेवक असलेल्या दुकानमालकाचे प्रेम पाहून या परिसरात रहिवाशांचे कुतुहलाचे केंद्र ही गाय बनली आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील कापड मार्केट पंडरी येथे आहे. या मार्केटमधील एका शोरुममध्ये रोज एक गाय नेमाने येत आहे. साड्यांची विक्री करणाऱ्या या दुकानाचे मालक स्वत: एक गोसेवक आहेत. त्यांचे नाव पदम डाकलिया आहे. पदम डाकलिया सांगतात की ही गाय जशी अचानक येथे आणि दुकानात बसते. तशी पुन्हा तिचा वेळ झाला की निघुनही जाते. सात वर्षांपूर्वी धनतेरसच्या दिवशी दुकानात पुजा सुरु असताना ही गाय अचानक त्यांच्या दुकानात शिरली. ते स्वत: गोसेवक असल्याने त्यांनी या गायीला प्रेमाने आपल्या जेवणातील घास भरवतात. त्यांचा गायीला लळा लागला असून ती देखील त्यांच्यावर तितकेच प्रेम करते. त्यांच्या डोक्याला चाटते.
या गायीने सर्वप्रथम साल 2016 च्या धनतेरसला त्यांच्या दुकानात प्रवेश केला होता. तेव्हापासून ती न चुकता रोज त्यांच्या शोरुमला भेट देत असते. स्वत: दुकानाचा दरवाजा ढकलून आत येते. दुकानाचे मालक पदम डाकलिया स्वत: गोसेवक असल्याने त्यांना गायीची सेवा करायला मिळत असल्याने ते स्वत: ला भाग्यवान समजत आहेत. पदम डाकलिया सांगतात या गायीला ते चंद्रमणी नावाने हाक मारतात. या गायीचे वासरु चंद्रभान देखील रोज तिच्या सोबत येते परंतू ते दुकानाच्या आत येत नाही. ते बाहेरच आपल्या आईची वाट पहात उभे असते.
ॲप्पलवाली गाय
पदम डाकलिया म्हणतात भारतात गायीला गोमाता म्हणतात. गाय केवळ दूधासाठीच नाही तर गोमूत्र आणि तिच्या शेणासाठी उपयुक्त आहे. तिच्या दर्शनाने आपल्याला पॉझिटीव्ह एनर्जी मिळते. पदम स्वत: एक गोशाळा चालवितात. त्यांनी गायीच्या शेणावरही संशोधन सुरु केले आहे. त्यासाठी संशोधकांची मदतही घेत आहेत. तिच्यासाठी दुकानात खास गादीही राखीव ठेवण्यात आली आहे. तिला ते प्रेमाने सफरचंद खायला देतात. त्यामुळे काही जण तिला एप्पलवाली गाय देखील म्हणतात.