छत्तीसगडमध्ये 16 माओवाद्यांना कंठस्नान; सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांत पुन्हा धुमश्चक्री, जंगलात सकाळपासून मोठी चकमक
Chhattisgarh Sukma Naxal Encounter : छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात माओवादी व पोलिसांमध्ये सकाळपासून चकमक सुरू आहे. यामध्ये 16 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले आहे.

छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात माओवादी व पोलिसांमध्ये सकाळपासून चकमक सुरू आहे. यामध्ये 16 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले आहे. सुकुमा जिल्ह्यातील गोगुंडा उपम्पल्ली जंगल परिसरात चकमक सुरू आहे. छत्तीसगड पोलीस व सीआरपीएफ या दोन टीमचे संयुक्त अभियान सुरू आहे. सुकमाचे पोलीस अधीक्षक या अभियानाचे नेतृत्व करीत आहेत. या मार्च महिन्यात छत्तीसगड राज्यातील ही चौथी मोठी चकमक आहे.
16 नक्षलवाद्यांचे मृतदेह
या चकमकीत 16 नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर सीआरपीएफच्या दोन जवानांना किरकोळ जखम झाली आहे. सुकमा जिल्ह्यातील केरलापाल क्षेत्रात नक्षलवादी असल्याचा सूचना 28 मार्च रोजी डीआरजी आणि सीआरपीएफ यांच्या दलाने ही संयुक्त कारवाई केली. नक्षल्यांसोबत चकमक सुरू झाली. गोळीबाराने हा संपूर्ण परिसर दणाणून गेला.




थांबून थांबून चकमक सुरूच होती. तर नक्षली मागे जात असल्याचे लक्षात येताच सुरक्षा दलांनी या परिसरात तपास सुरू केला. या सर्चिंग ऑपरेशनमध्ये आतापर्यंत 16 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. या गोळीबारात दोन जवानांना किरकोळ जखम झाल्याचे समोर येत आहे. त्यांना उपचारांसाठी तुरूंगात पाठवण्यात आले आहे.
बीजापूरमध्ये 30 नक्षलवादी ठार
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात पोलीसांनी मोठी मोहीम राबवली आहे. 20 मार्च रोजी पोलीस आणि संयुक्त सुरक्षा दलांच्या संयुक्त मोहिमेत नक्षलवाद्यांवर प्रहार करण्यात आला. गंगालूर पीएस लिमिटजवळ बीजापूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत 30 नक्षलवादी ठार झाले होते. याठिकाणी जवळपास 45 नक्षलवादी होते. शोध मोहिमेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा मिळाला. या चकमकीत बीजापूर DRG चा एक जवान शहीद झाला.
2026 पर्यंत देश नक्षलवाद मुक्त
20 मार्च रोजी नक्षलवादी चकमकीनंतर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देश लवकरच नक्षलवाद मुक्त करण्याचे सूतोवाच केला. त्यांनी एक्सवर याविषयीची पोस्ट लिहिली. नक्षलवाद मुक्त भारत अभियानात आपल्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. बीजापूर आणि कांकेर या दोन ठिकाणी दोन सशस्त्र दलांनी केलेल्या ऑपरेशनमध्ये 22 नक्षलवादी ठार झाल्याचे ते म्हणाले. इतक्या सुविधा देऊनही जे नक्षलवादी आत्मसमर्पण करणार नाही, त्यांच्यासाठी झिरो टॉलेरन्सचे धोरण राबवण्यात येईल, असे ते म्हणाले. 31 मार्च 2026 रोजी देश नक्षलवाद मुक्त होईल असे आश्वासन त्यांनी दिले.