महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यावर मुख्यमंत्र्यांना जाग आली; आता थेट दिल्ली गाठणार आणि…
नवे उद्योगधंदे, प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याबाबत मुख्यमंत्री दिल्ली स्तरावर भेटीगाठी घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुंबई : वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट (Vedanta-Foxconn Joint Venture) हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. विरोधकांनी धारेवर धरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. मुख्यमंत्री या प्रकल्पासाठी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
बुधवारपासून मुख्यमंत्र्यांचा हा दोन दिवसीय दिल्ली दौरा असणार आहे. या दौऱ्यात ते केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठीही घेणार आहेत. राज्यातून गुजरातला गेलेला वेदांता प्रकल्पामुळे सरकार गोत्यात आले आहे. यामुळे मुख्यमंत्री खडबडून जागे झाले आहेत.
नवे उद्योगधंदे, प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याबाबत मुख्यमंत्री दिल्ली स्तरावर भेटीगाठी घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्रीय मंत्री आश्विणी वैष्णव आणि नितीन गडकरी यांचीही मुख्यमंत्री भेट घेणार असल्याचे समजते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येतील असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर हा दौरा असल्याचे समजते.
रखडलेला उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार, राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या आणि महाराष्ट्रात नव्याने उद्योगधंदे, व्यापार आणि प्रकल्प आणण्याबाबत या दौऱ्यात चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय स्तरावरील मंत्री, उद्योजक यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे समजते.