मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर, हा नेता करणार प्रवेश!
मुख्यमंत्री केसीआर मंगळवारी पंढरपुरमध्ये विठ्ठल रूक्मिणी मंदिरात दर्शन घेणार आहे. यासोबत तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेणार आहेत.
सोलापुर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव आपल्या मंत्रिमंडळासोबत हैदराबादवरुन महाराष्ट्रातील सोलापुरमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री केसीआर मंगळवारी पंढरपुरमध्ये विठ्ठल रूक्मिणी मंदिरात दर्शन घेणार आहे. यासोबत तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एक बस आणि 600 हून अधिक गाड्यांचा समावेश आहे. सोलापूरला जाणाऱ्या टीममध्ये जवळपास सर्वच आमदार, खासदार, मंत्री यांचा समावेश आहे. बीआरएस कार्यकर्त्यांनी जल्लोषात घोषणाबाजी करत हैदराबादहून ताफा सोमवारी सकाळी प्रगती भवनातून निघाला. तेलंगणाचे मुख्यमंत्री मंगळवारी पंढरपूर आणि तुळजा भवानी मंदिरात जाण्यापूर्वी सोलापुरातील विणकाम उद्योग आणि हातमाग युनिटची पाहणी करतील. महाराष्ट्रातील नेते भगीरथ भालके सोलापुरात बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत.
के. चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांना अभिवादन करण्यासाठी हजारो लोक महाराष्ट्र राज्यातील खेड्यापाड्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे होते. यावेळी जमलेल्या लोकांनी किसान सरकार आणि केसीआर जिंदाबादच्या घोषणा दिल्या. दोन्ही राज्यांच्या सीमांना जोडणाऱ्या गावांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ‘देश का नेता कैसा हो केसीआर जैसा हो’, अशा घोषणा देत केसीआर यांचे भव्य स्वागत केलं गेलं.
दरम्यान, चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पार्टीने भाजप नेत्या पंकजा मुडे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे पक्षात आल्यास त्यांनाच मुख्यमंत्री करू, अशी ऑफरच पंकजा मुंडे यांना देण्यात आली आहे. त्यावर पंकजा यांनी अद्याप काहीच भाष्य केलेलं नाही. त्यामुळे त्या काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.