नवी दिल्ली | 8 डिसेंबर 2023 : भाजपाला तीन राज्यात सत्ता मिळाल्यानंतर तेथील मुख्यमंत्री अद्याप ठरायचे आहेत. भाजपाने राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे पक्षाचे निरीक्षक पाठविण्याची घोषणा केली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांना राजस्थानचे निरीक्षक म्हणून पाठविण्यात येणार आहे. तर हरियाणाचे सीएम मनोहर लाल खट्टर, के. लक्ष्मण, आशा लकडा यांना मध्यप्रदेशची जबाबदारी सोपविली आहे. तर छत्तीसगडसाठी अर्जून मुंडा, सर्वानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांची निवड करण्यात आली आहे. हे पर्यवेक्षक आमदारांची बैठक घेऊन त्यांची मते आजमविणार आहेत. भाजपा श्रेष्ठींच्या अंतिम मंजूरीनंतर रविवारी मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
भाजपाने पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकीत तीन मोठी राज्ये जिंकली आहेत. त्यात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड यांचा समावेश आहे. या राज्यात कॉंग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. भाजपाने लोकसभा निवडणूकी आधीच ही उत्तरेच्या हिंदी पट्ट्यातील आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे लोकसभेची ही रंगीत तालीम मानली जात होती.
भाजपाने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करता या निवडणूका लढल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि करिष्म्यावरच या निवडणूका जिंकल्या होत्या. त्यामुळे आता या राज्यात मुख्यमंत्री जाहीर करण्याची मोठी कसोटी भाजपावर आहे. भाजप या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर लोकसभा 2024 च्या निवडणूकीचे गणित रचणार आहे. तसेच स्थानिक बंडखोरीला रोखण्याचेही भाजपापुढे मोठे आव्हान आहे.
तीन राज्यात भाजपाने मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचे यावरुन पक्षात खलबते सुरु आहेत. भाजपाने 11 खासदारांना राजीनामा द्यायला लावला आहे. या सर्वांनी विधानसभेत विजय मिळविला आहे. या खासदारांपैकी अनेक जण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत.
राजस्थान – वसुंधरा राजे, खासदार दीया कुमारी, ओम बिरला, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत आणि बाबा बालकनाथ यांची नावे सीएम पदाच्या शर्यतीत आहेत.
मध्यप्रदेश – शिवराज सिंह चौहान, प्रल्हाद पटेल, नरेंद्र सिंह तोमर, कैलास विजय वर्गीय आणि ज्योतिरादित्य सिंधीया सह अनेक नावे शर्यतीत आहेत.
छत्तीसगड – रमन सिंह, भाजपा प्रदेश अध्यक्ष अरुण साव, रेणूका सिंह आणि ओपी चौधरी यांची नावे छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत.