‘चीनचे राष्ट्राध्यक्ष युद्धाची गर्जना करतायंत, तरीही मोदी सरकारमधील नेते शांत का?’
भारतीय सैन्याने चुशूल सेक्टरमधील महत्त्वाच्या ठिकाणांवरून माघार घ्यावी, असे चीनचे म्हणणे आहे. | Subramanian Swamy on India China tension
नवी दिल्ली: चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या सैनिकांना युद्धाला तयार राहा, असे जाहीरपणे सांगितले. चीनकडून अशाप्रकारे युद्धाची गर्जना होत असताना मोदी सरकारमधील नेते का शांत आहेत, असा थेट सवाल भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केला. गेल्या काही महिन्यांपासून पूर्व लडाखच्या परिसरात भारतीय आणि चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. मध्यंतरी झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती खूपच चिघळली होती. यानंतर सातत्याने चर्चेच्या फेऱ्या सुरू असूनही अजूनही भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्नावर तोडगा निघालेला नाही. (Subramanian Swamy on India China tension in eastern Ladakh)
या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून स्वपक्षीयांना चिमटे काढले. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सीमारेषेवरील आपल्या सैन्याला युद्धासाठी तयार राहा, असे सांगितले. तरीही मोदी सरकारमधील एकही नेता त्याला प्रत्युत्तर देत नाही. आम्ही तुम्हाला सरळ किंवा वाकड्या कोणत्याही मार्गाने घरी पाठवण्यासाठी समर्थ आहोत, हे एकाही नेत्याने ठणकावून सांगू नये, हे आश्चर्यकारक असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
China’s Supremo Xi Jingping has openly declared to Chinese troops in LAC– inside&across : “Be ready for war”. It is surprising that no one from our government has replied: “Yes, we are waiting to send you home—horizontally or vertically—choice is yours”?
— Subramanian Swamy (@Swamy39) October 17, 2020
दरम्यान, चीनने आता भारतासमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. भारतीय सैन्याने चुशूल सेक्टरमधील महत्त्वाच्या ठिकाणांवरून माघार घ्यावी, असे चीनचे म्हणणे आहे. मात्र, सैन्य माघार ही दोन्ही बाजूंनी झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका भारताने घेतली. त्यासाठी चीनने पँगाँग सरोवरच्या परिसरातून सैन्य माघारी घ्यावे, असे भारताकडून सांगण्यात आले.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या माहितीनुसार, चीनच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने सात ठिकाणी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) पार केली आहे. यापैकी चुशूल सेक्टरमधील भारतीय सैन्याची उपस्थिती चीनच्या डोळ्यात खुपत आहे. या भागावर ताबा मिळवल्यामुळे भारतीय सैन्याला स्पांगुर गॅप आणि मोल्दो परिसरातील चिनी सैन्यावर नजर ठेवता येणे शक्य झाले आहे. चीनच्या सैन्याने तीनवेळा घुसखोरी करून ही ठिकाणे पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कमालीच्या सतर्क असलेल्या भारतीय जवानांनी आतापर्यंतचा चीनचा प्रत्येक डाव उधळून लावला आहे.
संबंधित बातम्या:
कोणत्याही परिस्थितीत भारतच चीनपेक्षा ‘भारी’- हवाईदलप्रमुख
पाकिस्तान आणि चीन एकत्र; पीओकेमध्ये अद्ययावत क्षेपणास्त्र यंत्रणा उभारण्याची तयारी
भारतानं सीमा भागात सुरू केलेल्या ‘या’ कामामुळं चीनचा जळफळाट
(Subramanian Swamy on India China tension in eastern Ladakh)