भारतासोबतच्या तणावात मालदीवची नवी खेळी! चिनी गुप्तहेर जहाजाला…
दुसरीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना आपला जिवलग मित्र म्हणणाऱ्या मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी चीनच्या गुप्तहेर जहाजाला मालदीवच्या हद्दीत येण्याची परवानगी दिली आहे.
नवी दिल्ली | 23 जानेवारी 2024 : राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर मालदीवने चीनला सोबत घेऊन भारताविरोधात नवे षडयंत्र रचले आहे. एकीकडे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवमध्ये असलेल्या 77 भारतीय सैनिकांना परत पाठविण्याची तयारी सुरु केली आहे. भारताने आपल्या सैन्याला 15 फेब्रुवारीपर्यंत परत बोलवावे असा इशारा मोहम्मद मुइज्जू यांनी दिला आहे. तर, दुसरीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना आपला जिवलग मित्र म्हणणाऱ्या मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी चीनच्या गुप्तहेर जहाजाला मालदीवच्या हद्दीत येण्याची परवानगी दिली आहे.
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझ यांनी भारताविरोधात पावले उचलली आहेत. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मुइज्जू यांनी मालदीवची परंपरा मोडली. मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतात न जाता चीनला भेट दिली होती. त्यातच आता भारतासोबत तणावपूर्ण संबंध निर्माण झाले असताना मुइज्जू सरकारने चिनी गुप्तहेर जहाजाला त्यांच्या जागेत घुसण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
मालदीवने चिनी जहाज माले येथे येणार असल्याच्या बातमीला पुष्टी दिली आहे. तसेच, मैत्रीपूर्ण राष्ट्रांच्या जहाजांचे स्वागत असल्याचेही म्हटले आहे. हे चिनी जहाज काही आठवड्यांत मालदीवमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. जियांग यांग हाँग 03 हे जहाज 16 जानेवारी रोजी चीनच्या बंदरातून मालदीवची राजधानी मालेच्या दिशेने निघाले आहे. सध्या ते जहाज हिंद महासागराजवळ पोहोचले आहेत. 30 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत हे जहाज मालदीवमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे.
चीनच्या या जहाजामुळे भारताची चिंता मात्र वाढली आहे. चीनकडे संशोधन आणि हेरगिरी क्षेत्रातील जहाजांचा सर्वात मोठा ताफा आहे. वैज्ञानिक आणि लष्करी दोन्ही उद्देशांसाठी हे जहाज सक्षम आहे. गेल्या वर्षी देखील चीनने श्रीलंकेच्या भूमीवर आपले गुप्तहेर जहाज उतरवले होते. त्यानंतर चीनच्या जहाजावर भारताची हेरगिरी केल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यावरून बराच गदारोळही झाला होता. परंतु, यावेळी चीनने मालदीवच्या मदतीने भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
चिनी हेरगिरी जहाजाच्या भेटीवर भारताने मालदीवकडे आक्षेप घेतला आहे की नाही याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु, याआधी चीनच्या गुप्तहेर जहाजाने शेजारील देश श्रीलंकेला भेट दिली होती तेव्हा नवी दिल्ली सरकारने ठोस पावले उचलली होती. मात्र, या सर्व घडामोडीवर भारतीय नौदल जहाज लक्ष ठेवून आहेत अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली.