मंत्र, तंत्र, योग-साधनेसाठी प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुसरा दौरा, काय आहे आख्यायिका?
संजय राऊत आज म्हणाले त्याप्रमाणे अघोरी विद्येसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. देवीच्या मंदिरात मांत्रिक आणि तांत्रिकांची नेहमीच मोठी गर्दी असते.
मुंबईः एखादी साधना, एखादी मोहीम सुरु करताना तुम्ही कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आलात आणि ते पूर्ण झाल्यावर पुन्हा मंदिरात आला नाहीत तर ती साधना अपुरी राहते, अशी आख्यायिका गुवाहटीतल्या (Guwahati) कामाख्या देवी (Kamakhya Devi) मंदिराबाबत सांगितली जाते. याच मान्यतेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उद्या 50 आमदार आणि 13 खासदारांसह देवीच्या दर्शनासाठी निघणार आहेत.
6 महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे आधी सूरत आणि नंतर गुवाहटीत पोहोचले होते. बंड यशस्वी झाल्याची चिन्ह दिसल्यानंतर शिंदे यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते महाराष्ट्राच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी बोललेलं नवस फेडण्यासाठी शिंदे 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनासाठी निघालेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राऊत आज म्हणाले त्याप्रमाणे अघोरी विद्येसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. देवीच्या मंदिरात मांत्रिक आणि तांत्रिकांची नेहमीच मोठी गर्दी असते.
आसाममधील शहर गुवाहटी येथे हे मंदिर आहे. कामाख्या हे शक्तिदेवता सतीचे मंदिर आहे. राजधानी दिसपूरपासून 6 किमी अंतरावर नीलांचल पर्वतरांगांत हे मंदिर आहे.
याच पर्वतरांगांची भूरळ महाराष्ट्रातल्या सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना पडली होती. काय झाडी.. काय डोंगर.. हा फेमस डायलॉग त्यांना सूचला..
कामाख्या देवीचं मंदिर दगडात कोरलेलं आहे. मंदिराच्या गर्भगृहात देवची विशेष भव्य अशी मूर्ती नाही. तर इथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते. इथून जवळ एका ठिकाणी देवीची मूर्ती आहे, पण हे महापीठ मानले जाते.
धार्मिक मान्यतांनुसार, भगवान शंकरप्रती देवी सतीचा मोहभंग करण्यासाठी विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने तिचे ५१ भाग केले होते. हे भाग जिथे जिथे पडले, तिथे शक्तीपीठं तयार झाली. नीलांचल पर्वतांमधील या स्थानी देवीची योनी पडली होती. त्यामुळेच हे सर्वात शक्तीशाली पीठ मानलं जातं.
देवीचं मंदिर हे योनीचंच मंदिर मानलं जातं. प्रत्येक स्त्रीला पाळी येते, त्याप्रमाणे कामाख्या देवीही रजस्वला होते, अशी आख्यायिका आहे. जून महिन्यातील तीन दिवस येथे अम्बुवाची पर्व असते…
योनीच्या आकारातील स्थानावर वर्षभर जिथे ब्रह्मपुत्रेचं पाणी असतं, ते पाणी सदर तीन दिवसात लाल रंगाचं होतं. देवीच्या मासिक पाळीमुळे हे लाल रंगाचं होतं, अशी मान्यता आहे. या तीन दिवसांसाठी मंदिराचे दरवाजे आपोआप बंद होतात, असं म्हटलं जातं.
कामाख्या देवीच्या भक्तांना मिळणारा प्रसादही वैशिष्ट्यपूर्ण असतो. देवी रजस्वला असते त्यावेळी पांढऱ्या रंगाचा कपडा मंदिरात अंथरला जातो. तीन दिवसानंतर दरवाजे उघडल्यानंतर हा कपडा लाल होतो. यालाच अम्बुवाची वस्त्र म्हणतात. हेच वस्त्र प्रसाद म्हणून भक्तांना दिलं जातं.
कामाख्या देवीचं मंदिर तीन भागात बांधण्यात आलंय. पहिल्या सर्वात मोठ्या भागात कुणालाही दर्शनाची परवानगी नसते. दुसऱ्या भागात देवीचे दर्शन होते. येथेच योनी भागाची मूर्ती आहे.
मनोकामना पूर्ण करण्यासाठी या मंदिरात कन्या पूजन आणि भंडाराही केला जातो. मंत्र-तंत्रासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे.
गुवाहटी इंटरनॅशनल एअरपोर्टवरून कामाख्या देवीचं हे मंदिर फक्त २० किलोमीटर अंतरावर आहे.
मंदिर परीसरापासून ६ किलोमीटर अंतरावर कामाख्या नावाचे रेल्वेस्टेशनदेखील आहे.