राम मंदिरासाठी ट्रस्टची घोषणा, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं अभिनंदन
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केल्याची माहिती दिली.
मुंबई : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन (Uddhav Thackeray congratulates Modi) केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली.
‘अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, हे सरकारचे कर्तव्यच होते. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन : उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करणयाचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे सरकारचे कर्तव्यच होते. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करणयाचे कतॆवय पार पाडलया बद्दल अभिनंदनःमा.ऊधदव ठाकरे. मुख्यमंत्री
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 5, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज राम मंदिराबाबत निवेदन दिलं. मोदी कॅबिनेटने राम मंदिर ट्रस्टला मंजुरी दिली आहे. मंदिर उभारण्यासाठी जो ट्रस्ट स्थापन करण्यात आला, त्याला ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ असं नाव देण्यात आलं आहे. त्याबाबत निवेदन देताना मोदी म्हणाले, “श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत भव्य-दिव्य श्रीराम मंदिर निर्माण आणि संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असेल”
“मी माझ्या हृदयाजवळच्या विषयावर बोलण्यासाठी आलो आहे. हा विषय म्हणजे अयोध्येतील राम मंदिर उभारण्याचा आहे. 9 नोव्हेंबरला मी जेव्हा करतारपूर कॉरिडोरसाठी पंजाबमध्ये होतो, तेव्हा मी राम मंदिराबाबतचा ऐतिहासिक निर्णय ऐकला” असं मोदी लोकसभेत म्हणाले.
भारताच्या प्राणवायूत, आदर्शात सर्वत्र प्रभू श्रीराम आणि अयोध्येचं ऐतिहासिक महत्त्व आहे. भविष्यात भाविकांची संख्या आणि श्रद्धा पाहता, सरकारने निर्णय घेतला आहे, अयोध्या कायद्यानुसार अधिगृहित सर्व जमीन 67 एकर ज्यामध्ये आत आणि बाहेरील अंगणाचा समावेश आहे, ती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राला सोपवण्यात येईल, असं मोदींनी सांगितलं.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माझ्या सरकारने जन्मभूमीत राम मंदिर उभारण्यासाठी योजना तयार केली आहे. श्री राम मंदिर जन्मभूमी तीर्थ क्षेत्र स्थापन करण्यात येईल. हा ट्रस्ट पूर्णपणे स्वतंत्र असेल. सुप्रीम कोर्टाचे निर्देश, अनेक चर्चांनंतर आम्ही अयोध्येत सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन मंजूर केली आहे, असं मोदी म्हणाले.
Uddhav Thackeray congratulates Modi