एक असं राज्य जिथे लोक वादळ येण्यासाठी करतात देवाची प्रार्थना, वादळानंतर सापडतं सोनच सोनं…
आंध्र प्रदेशातील उप्पाडा गावात वादळानंतर समुद्रकिनारी सोन्याचे कण आणि दागिने सापडतात. स्थानिक मच्छिमार वादळानंतर समुद्रकिनाऱ्यावर सोन्याचा शोध घेतात आणि दिवसाला 500 ते 800 रुपयांचे सोनं गोळा करतात. त्यांच्या मते, पूर्वी समुद्रात बुडालेल्या शहरातील हे सोनं आहे. हे एक अद्भुत आणि अनोखे दृश्य आहे जे पर्यटकांनाही आकर्षित करते.
नैसर्गिक आपत्ती कोणतीही असो लोकांना नकोशी असते. नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड नुकसान होतं. घरदार उद्ध्वस्त होतं. गावची गावं कोलमडून पडतात. होतं नव्हतं सर्व मातीला मिळून जातं. वादळानंतर उरतात फक्त त्या बरबादीच्या खुणा… समुद्र किनारी राहणारे लोक तर वादळाला सर्वाधिक घाबरतात. कारण वादळाचा सर्वाधिक फटका याच लोकांना बसतो. पण देशातील आंध्रप्रदेश असं राज्य आहे की तिथे लोक वादळाची वाट पाहतात. वादळ यावं म्हणून देवाकडे प्रार्थना करतात. कारण…
आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील उप्पाडा समुद्र किनारी जेव्हा केव्हा वादळ येतं तेव्हा स्थानिक लोक खूश होतात. वादळ गेलं की वादळासोबत आलेलं सोनं मिळवण्यासाठी अख्खं गाव जमा होतं. शेकडो लोक हातात कंगवा घेऊन समुद्र किनारी जाऊन रेतीत सोनं शोधण्याचा प्रयत्न करत असतात.
हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले. पण ही सत्य गोष्ट आहे. उप्पाडा बंदरावरील मच्छिमार वादळानंतर सोन्याचा शोध घेत असतात. या ठिकाणी कधीही वादळ येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे लोक खिशात नेहमीच कंगवा ठेवत असतात. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात आणि निघून जातात. त्यानंतर मच्छिमार कंगवा घेऊन वाळूत रेषा मारण्याचं काम करतात. त्याचेवळी त्यांना चमकणारी वस्तू दिसते. या चमकणाऱ्या वस्तू त्या एकत्र करतात. ही वस्तू दुसरी तिसरी काही नसून सोनं असतं.
किती सोनं सापडलं?
वादळानंतरचं दृश्य अत्यंत वेगळंच असतं. खरं तर वादळानंतर लोक उद्ध्वस्त झालेलं घर सावरण्याच्या कामाला लोक लागतात. पण उप्पाडा येथील परिस्थिती काही औरच आहे. या ठिकाणी लोक समुद्र किनारी एकत्र जमतात. आता ते सोन्याचे कण आणि किमती मोती शोधतात. काही लोक कंगव्याच्या मदतीने वाळूवर रेषा मारून सोनं हुडकतात. तर काही लोक वाळू प्लास्टिकच्या ट्रेमध्ये भरून त्यातून सोनं काढण्याचा प्रयत्न करतात. छोटे छोटे सोन्याचे कण गोळा करतात. दिवसाला 500 ते 800 रुपयांचं सोनं एकत्र करतो असं मच्छिमारांचं म्हणणं आहे. काकीनाच्या कोठापल्ली उप्पाडा बंदरावर ही सोन्याची शोध मोहीम सुरू असते.
समुद्रात शहर बुडालं
या उप्पाडा बीचवर देशभरातून पर्यटक फिरण्यासाठी येतात. अत्यंत सुंदर असा हा बीच आहे. स्थानिक लोकांच्या मते आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सोन्याचा शोध घेत असतो. केवळ सोन्याचेच कण या ठिकाणी सापडत नाही, तर कधी कधी सोन्याचा तुकडा आणि अख्खा दागिनाही सापडतो, असं या मच्छिमारांचं म्हणणं आहे. स्थानिक लोकांच्या मते हे कधीकाळी एक मोठं शहर होतं. त्याकाळात आलेल्या मोठ्या वादळामुळे हे शहर समुद्रात बुडालं होतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा समुद्र शांत होतो, तेव्हा तेव्हा किनाऱ्यावर सोनं सापडतं, असं स्थानिक मच्छिमारांचं म्हणणं आहे.