Illegal Goa Bar Row : गोव्यातील बारपासून 10 किमीवर स्मृती इराणींचे आलिशान घर; खळबळजनक पुरावे देत काँग्रेसने केली राजीनाम्याची मागणी
काँग्रेसने पुन्हा एकदा खळबळजनक पुरावे देत स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुलीच्या बारपासून 10 किमीवर स्मृती इराणींचे आलिशान घर असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी(Smriti Irani) यांची मुलगी जोईश इराणी या गोव्यात सिली सोल्स कॅफे अँड बार(bar in Goa) नावाचे जे रेस्टॉरंट चालवतात, त्याचे लायसन्स बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. यानंतर आता काँग्रेसने पुन्हा एकदा खळबळजनक पुरावे देत स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुलीच्या बारपासून 10 किमीवर स्मृती इराणींचे आलिशान घर असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्षांना आमचे आवाहन आहे की, तुमच्या पक्षाच्या नेत्यांच्या लज्जास्पद आणि असभ्य वक्तृत्वाबद्दल देशातील महिलांची माफी मागावी, अशी मागणी केली काँग्रेसने केली आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचा अवैध बार असल्याचा आरोप करत काँग्रेसने खळबळ उडवून दिली. गोव्यातील बारपासून दहा किमी अंतरावर असलेल्या कोर्जुए या गावात स्मृती इराणींच्या नावे अलिशान घर असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या मीडिया प्लॅटफॉर्मने हा दावा करत दोन फोटो ट्वीट केले आहेत.
शेअर केलेल्या एका फोटोत जुबिन इराणी दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत 65 लाख रुपयांचा उल्लेखही केला आहे. इराणींची मुलगी झोईश इराणी ही मृत माणसाच्या नावावर परवाना घेऊन गोव्यात बार रेस्टॉरंट चालवित असल्याचा आरोप काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केला होता. तसेच यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला होता.
इराणींची काँग्रेसला कायदेशीर नोटीस
सिली सोल्स कॅफे अँड बारवरून स्मृती इराणींच्या मुलीवर काँग्रेसने केलेले आरोप आता कायदेशीर नोटिशीपर्यंत पोहोचले असून इराणी यांच्या वकिलाने काँग्रेस पक्ष, जयराम रमेश, पवन खेरा आणि नेटा डिसूझा यांना ही नोटीस पाठविली आहे.
एसआयटी चौकशीची मागणी
उत्तर गोव्यातील आसगाव येथे खोटी कागदपत्रे आणि चुकीच्या प्रक्रियेद्वारे केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या कुटुंबा मधील एकाने रेस्टोरेंटला परवानगी मिळवली आहे,असा दावा करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी या प्रकरणाची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एसआयटी नेमुन त्वरित चौकशी करावी,आणि चौकशी पूर्ण होई पर्यंत ईराणी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा,अशी मागणी केली आहे.
पाटकर यांनी या रेस्टोरेंटसाठी घेतलेल्या बारच्या परवान्याचे नुतनीकरण मृत व्यक्तीच्या नावे करण्यात आल्याचा दावा केला असून आता उत्पादन शुल्क खात्याने त्या रेस्टोरेंटला कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यावर 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सुनावणी ठेवली आहे. ही कारणे दाखवा नोटिस बजावलेल्या अधिकाऱ्यावर आता प्रचंड दबाव येत असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे,अशी मागणी काँग्रेसने केली आहे.सरकारने त्याची दखल घेतली नाही तर काँग्रेस याप्रकरणी तक्रार दाखल करणार, असा इशारा पाटकर यांनी दिला आहे.