मुंबई : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसचा मानहाणीकारक पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला रोखण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरली. इतकंच नाही तर पंजाबमधील सत्ताही काँग्रेसनं गमावली. आम आदमी पक्षानं पंजाबमधून काँग्रेसला ‘झाडू’नं सफाया केलाय. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अशावेळी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी काँग्रेस कार्यकारिणीची (Congress Working Committee) बैठक बोलावली आहे. या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे तिघेही बाजूला होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, काँग्रेसकडून अशी शक्यता स्पष्टपणे नाकारण्यात आली आहे.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये मंथन प्रक्रियेला सुरुवात झालीय. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. महत्वाची बाब म्हणजे सोनिया यांनी CWC च्या बैठकीपूर्वी काँग्रेस संसदीय दलाची बैठक पार पडणार आहे. ही बैठक सकाळी 10.30 वाजता ’10 जनपथ’वर होणार आहे. तर दुपारी 4 वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या दोन्ही बैठकीत पाच राज्यातील पराभवावर साधक-बाधक आणि आक्रमक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तसंच आगामी निवडणुकीसाठीची रणनिती आणि तयारीबाबतही या बैठकीत मंथन होईल, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
Congress Parliamentary Party (CPP) chairperson Sonia Gandhi has called a meeting of the party’s parliamentary strategy group at 10.30 am at 10 Janpath tomorrow
— ANI (@ANI) March 12, 2022
महत्वाची बाब म्हणजे पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसचे शिर्ष नेतृत्व असलेल्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे सर्व महत्वाच्या पदांवरून राजीनामा देण्यात असल्याचीही बातमी पसरत आहे. मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी आणि तिला कुठलाही आधार नाही, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केलंय.
The news story of alleged resignations being carried on NDTV based on unnamed sources is completely unfair, mischievous and incorrect.
It is unfair for a TV channel to carry such unsubstantiated propaganda stories emanating from imaginary sources at the instance of ruling BJP.
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 12, 2022
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचं नेतृत्वत प्रियंका गांधी यांच्याकडे देण्यात आलं होतं. पण तिथे प्रियंका गांधी यांचा करिश्मा पाहायला मिळाला नाही. इतकंच नाही तर काँग्रेस दोन आकडी संख्याही गाठू शकली नाही. गोव्यात काँग्रेस काहीतरी कमाल करुन दाखवेल असा अंदाज होता. मात्र, तिथेही भाजपला रोखण्यात काँग्रेसला पूर्ण अपयश आलं. तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेली पंजाबची सत्ताही काँग्रेसनं गमावली आहे. पंजाबमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने एकहाती सत्ता मिळवली. तर उत्तराखंड आणि मणिपूरमध्येही काँग्रेस भाजपची सत्ता उलथवून टाकू शकली नाही. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अशावेळी उद्या होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या :