BIG BREAKING | बेळगावात आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळवली, प्रचंड गदारोळ, नेमकं काय घडलं?
बेळगावात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळून लावण्यात आली आहे. या घटनेचे काही व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते भगवे झेंडे घेऊन सभेत शिरले असल्याचं व्हिडीओत दिसतंय.
बेळगाव : बेळगावातून एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा बेळगावात उधळून लावण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी प्रणिती शिंदे यांची सभा उधळून लावली आहे. बेळगाव जवळच्या देसूर गावात काँग्रेस उमेदवारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेत भगवे ध्वज घेऊन मराठी भाषिक घुसले. यावेळी घोषणा देत कार्यकर्त्यांनी सभा उधळून लावली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभातील घडामोडींना वेग आला आहे. बेळगावातील वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची नुकतीच बेळगावात सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. बेळगाव हा मराठी भाषिकांचा प्रांत असताना त्याला कर्नाटकात नेल्याने दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे. बेळगावातील मराठी भाषिकांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे.
तिथल्या काही मराठी भाषिकांचा कल हा मराठी माणसांच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दिशेला झुकतो. कर्नाटकातील निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे देखील उमदेवार निवडणूक लढवत आहेत. असं असताना महाराष्ट्रातील नेते काँग्रेस आणि इतर पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावात जात असल्याने काही मराठी भाषिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. यातूनच बेळगावात प्रणिती शिंदे यांच्या सभेत गदारोळ झाला.
कर्नाटकात 10 मे ला मतदान
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 10 मे ला मतदान होणार आहे. तर 13 मे ला निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. प्रत्येक पक्षाकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. या प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फैऱ्या झडत आहेत. असं असताना प्रणिती शिंदे यांच्या सभेला उधळून लावण्यात आल्याची घटना समोर आली.
विशेष म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा वाद आहे. या मुद्द्यावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही महिन्यांपूर्वी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांच्या चिथावणीखोर प्रतिक्रियांमुळे सीमाभागात तणाव निर्माण झाला होता. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला होता.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेते कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला गेल्याच्या मुद्द्यावरुन तिथले मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. याआधी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला विरोध झाल्याची माहिती समोर आलेली. बेळगावातील मराठी भाषिकांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना होणारा विरोध लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावात भाजप नेत्याचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी काल समोर आली होती.