10 लाख नोकऱ्या, 300 युनिटपर्यंत मोफत वीज, गुजरात काँग्रेसनी दिली मोठी अश्वासनं…
गुजरात काँग्रेसने युवकांपासून शेतकऱ्यांपर्यंतच्या नागरिकांना खूष करण्यासाठी आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये त्यांनी 10 लाख नोकऱ्यांचे अश्वासन दिले आहे.
नवी दिल्लीः गुजरात विधानसभा निवडणुका असल्याने राज्यातील सर्व पक्षांनी आता जोरदार तयारी केली आहे. गुजरातच्या राजकारणातून गेल्या 27 वर्षांपासून गुजरात काँग्रेस सत्तेतून बाहेर आहे. त्याच काँग्रेसने आता मतदारांना आपल्या पक्षाकडे खेचून घेण्यासाठी जाहीर केलेल्या घोषणापत्रात मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुथ्ये 300 युनिटपर्यंतची वीज मोफत आणि त्या बरोबरच 10 लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री आणि गुजरात काँग्रेसचे प्रभारी अशोक गेहलोत यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये त्यांनी काँग्रेस सत्तेत आल्यानंतर दिलेली अश्वासनं पूर्ण करणारच असल्याचा शब्द दिला आहे.
या दोन महत्वाच्या घोषणांबरोबरच काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात पुढील गोष्टींबाबतही गुजरातच्या जनतेला अश्वासन दिले आहे.
गुजरात काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात 10 लाख युवकांना नोकरी देण्याचे अश्वासन दिले आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर राज्यातील सरकारी पदांची भरती करणार असल्याचा शब्द दिला आहे.
त्यामध्ये महिलांना 50 टक्के आरक्षणही देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गुजरातमधील 3.26 कोटी मतदार हे 18 ते 49 या वयोगटातील आहे. तर 1.12 लाख मतदार हे 18 ते 19 वयोगटातील आहेत.
त्यामुळे काँग्रेसने या वयोगटातील तरुणांना नोकरीचे अश्वासन देऊन पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या अश्वासनांबरोबच त्यांनी इतरही अश्वासनं जाहीरनाम्यातून सांगितली आहेत.
गुजरातमध्ये 2011 साली झालेल्या जनगणनेनुसार 55 लाखापेक्षाही अधिक शेतकरी असून त्यामध्ये 20 लाखापेक्षाही अधिक लहान शेतकरी असल्याची नोंद त्यावेळी करण्यात आली होती. त्यामुळे गुजरात काँग्रेसने आता शेतकऱ्यांनाही आकर्षित करण्यासाठी 300 युनिटपर्यंत मोफत वीज आणि शेतकऱ्यांसाठी 10 तास वीज देण्याचे अश्वासन देण्यात आले आहे.
गुजरात निवडणुकांमध्ये काँग्रेसने खूप मोठी अश्वासनं दिली आहेत. युवकांसाठी तर रोजगारावर भर देत रोजगार नसलेल्या बेरोजगारांना महिना तीन हजार रुपयांचा भत्ता देण्याचे अश्वासन देण्यात आले आहे.
या बरोबरच सैन्य भरतीसाठी तयारी करण्यासाठी सॅम माणकेशा मिलिटरी अकादमीची स्थापना करण्याचे अश्वासनही देण्यात आले आहे.
कौशल्य विकास साधण्यासाठीविश्वकर्मा हुनर निर्माण योजनाही सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना मोफत अँड्राईड मोबाईल देणार असल्याचे अश्वासन देण्यात आले आहे.
गुजरात काँग्रेसने युवकांना ज्या प्रमाणे मोठमोठी अश्वासनं दिली आहेत, त्याच प्रमाणे शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेत आली तर शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
त्याबरोबर राज्यातील दूध उत्पादकांना पाच रुपयांपर्यंत सबसिडी देण्याचे वचनही दिले गेले आहे. या अश्वासनांचा काँग्रेसला फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या अश्वासनांबरोबच त्यांनी 10 तास मोफत वीज देणार असल्याचे सांगून जुनी वीज बिल असतील तर ती माफ केली जातील असंही सांगण्यात आले आहे.
काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात आणखी महत्वाचे अश्वासन दिले आहे. गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर गॅस सिलिंडर 500 रुपये करणार असल्याचे सांगितले आहे.
तर काँग्रेसने युवक, शेतकऱ्यांबरोबर आता मुलींसाठीही मोठी घोषणा केली आहे. गुजरात राज्यातील सरकारी नोकीर महिलांसाठी 50 टक्के आरक्षण देणार असल्याचा शब्द दिला आहे.
या बरोबरच केजी पासून पीजीपर्यंत मोफत शिक्षणाचा नाराही देण्यात आाला आहे. या अश्वासनांबरोबच काँग्रेस पक्ष सत्तेत आल्या नंतर 300 इंग्रजी माध्यमाच्या शाळा खोलणार असा शब्दही दिला आहे.
काँग्रेसने स्पष्टपणे सांगितले आहे की, काँग्रेसचे सरकार आल्यास ते सरकारी विभागातील आऊटसोर्सिंगची कामंही बंद करणार. त्याऐवजी कायमस्वरूपी नोकरीचे अश्वासन देण्यात आले आहे.
याशिवाय जुनी पेन्शन योजनाही सुरु करण्याचे मोठे अश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय 10 वर्षांहून अधिक काळ गुजरातच्या सरकारी विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही नियमित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास गुजरातमधील प्रत्येक नागरिकाला 10 लाखांपर्यंतचा उपचार खर्च मोफत केला जाणर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याबरोबर आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून मोफत औषधोपचारांचे अश्वासन देण्यात आले आहे.
या बरोबरच अपंग, विधवा, गरजू महिलांना दरमहा दोन हजार रुपये दिले जाणार असल्याचा विश्वास गुजरात काँग्रेसने गुजरातच्या नागरिकांना दिला आहे.