काँग्रेसला आणखी रुजवायचं असेल तर या नेत्याशिवाय पर्याय नाही; गेहलोतांनी आपलं मत स्पष्टच सांगितलं
मल्लिकार्जुन खर्गे दलित नेते असून त्यांना राजकारणाचा आणि काँग्रेस पक्षाचा 50 वर्षांचा अनुभव आहे. त्याच बरोबर शशी थरूर यांच्या विचारांमुळे आता काँग्रेस पक्षही मजबूत होईल का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक (Congress President Election 2022) जाहीर झाल्यानंतर राजस्थान काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली. राजस्थानातील राजकारण तापल्यामुळे काँग्रेसमधीलही गटबाजी हळूहळू उघड होऊ लागली. त्याला कारण होतं, गांधी घराणे या निवडणुकीपासून अलिप्त राहिले. त्यामुळे काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांमध्ये खरी रस्सीखेच लागली. त्यानंतर गेहलोत आणि पायलट यांच्या वादावर पडदा पडल्यानंतर मात्र शशी थरुर (Shashi Tharoor) आणि मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यात आता लढत सुरु झाली आहे. त्यामुळे हे वाद संपतात न संपतात तोच अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष पदाच्या वादात उडी घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाला पसंदी दिली आहे.
अशोक गेहलोत यांनी रविवारी जयपूर येथे बोलताना सांगितले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेस अध्यक्षपदासाठी पात्र आहेत. कारण खर्गे यांना राजकारणाचा 50 वर्षांचा अनुभव आहे. तर त्याचवेळी शशी थरुर यांच्याविषयीही मत व्यक्त करताना ते म्हणाले की, थरूर यांच्या विचारांमुळे पक्षाला बळ मिळेल यामध्ये मात्र शंका नाही.
गेहलोत बाजूला गेल्यामुळे आता काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या पुढील अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्येच निवडणूक होणार आहे.
त्याचबरोबर सर्वोच्च पदासाठीच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा यावर आता पक्षश्रेष्ठींमध्ये आता फूट पडली आहे. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेस अध्यक्षपदासाठी योग्य आहेत आणि पात्रही आहेत.
यावेळी त्यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ते दलित नेते असून त्यांना राजकारणाचा आणि काँग्रेस पक्षाचा 50 वर्षांचा अनुभव आहे. त्याच बरोबर शशी थरूर यांच्या विचारांमुळे आता काँग्रेस पक्षही मजबूत होईल का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शशी थरुर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की,थरूर यांना आंतरराष्ट्रीय घडामोडींची प्रचंड जाण आहे आणि त्यांनी जागतिक पातळीवरही भारताची बाजू सांभाळली आहे. मात्र काँग्रेस पक्ष केवळ तळागाळातील नेताच चांगल्या पद्धतीने पक्ष हाताळू शकतो असंही त्यांनी सांगितले.
गांधी जयंतीनिमित्त प्रसारमाध्यमांशी त्यांनी सांगितले की, मल्लिकार्जुन खर्गे यांनी 11 वेळा निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे संघटना, पक्ष वाढवण्यासाठी त्याचा चांगला फायदा करुन घेता येणार आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांचा उमेदवारी अर्ज भरताना गेहलोत यांनी सांगितले की, खर्गे यांना काँग्रेस मजबूत करण्याचा अनुभव आहे, त्यामुळे ते निवडणुकीत स्पष्ट आणि बहुमताने विजयी होतील असा विश्वासह त्यांनी व्यक्त केला.
शुक्रवारी पक्षाच्या मुख्यालयात खर्गे यांच्या नामांकनावेळी काँग्रेसमधील जवळपास 30 ज्येष्ठ नेते त्यांच्यासोबत होते. गेहलोत यांनी त्यांच्या उमेदवारीविषयी विश्वास व्यक्त केला असून त्यांच्या नेतृत्त्वाचा पक्षाला फायदाच होणार आहे.
त्यामुळे त्यांना गांधी घराण्याचाही पाठिंबा आहे आणि काँग्रेस अध्यक्षपदासाठी ते त्यांचे आवडते उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर दुसरीकडे शशी थरुर यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाच्या तयारीसाठी जोरदार प्रचार चालू केला आहे. पक्षाच्या कामावर जे समाधानी आहेत त्यांनी खर्गे साहेबांची निवड करावी आणि ज्यांना बदल हवा आहे त्यांनी माझी निवड करावी असंही त्यांनी नुकतच एका बैठकीत सांगितले.