सर्वोच्च पदावरील व्यक्तीविरोधात कट रचणे हा पण राजद्रोहच, हायकोर्टाने कुणाला फटकारले
Delhi High Court : आरोप-प्रत्यारोपाच्या बाजार राजकीय आखाड्यात भरतो. पण न्यायपालिकेत असे बेछुट आरोप करता येत नाही. त्यासाठी पुरावे सादर करावे लागतात. ते पण सज्जड. दिल्ली हायकोर्टात दाखल एका याचिकेत न्यायालयाने केलेली विशेष टिप्पणी सर्वच राजकीय पक्ष, त्यांचे हितसंबंधींसाठी झणझणीत अंजन म्हणता येईल.
राजकीय आखाड्यात बिनबुडाचे आरोप करणे सोपे असते. बेछुट आरोपांच्या फैरीही झाडता येतात. पण कोर्टाची पायरी चढल्यानंतर मर्यादांचे पूल लांघावे लागत नाहीत आणि सज्जड पुराव्याशिवाय केलेला युक्तीवाद टिकत नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल एका मानहानी प्रकरणात, न्यायालयाने केलेली टिप्पणी सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या हितसंबंध जपणाऱ्यांसाठी झणझणीत अंजनासारखे आहे. काय आहे हे प्रकरण, हायकोर्टाने काय केली टिप्पणी?
काय आहे प्रकरण
ओडिशातील बिजू जनता दलाचे खासदार पिनाकी मिश्रा यांनी दिल्ली हायकोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. ते पुरी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. प्रकरणात न्यायालयाने वकील जय अनंत देहाद्रोई यांना समन्स बजावले आहे. यादरम्यान कोर्टाने एक विशेष टिप्पणी केली आहे. ‘ देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीविरोधात कट रचणे हा देशद्रोह आहे.’ असे मत न्यायमूर्ती जसमीत सिंह यांनी नोंदवले आहे. याचिकेत वकील देहाद्राई यांनी भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावले. त्यांना उडियाबाबू ,पुरीचा दलाल अशा मानहारीकारक टिप्पणी केल्याचा आरोप मिश्रा यांनी लावला आहे.
वकील देहाद्राई दोन पाऊल मागे
हायकोर्टात हे प्रकरण आल्यानंतर आता कील जय अनंत देहाद्रोई दोन पाऊलं मागे आले आहेत. सीबीआय याप्रकरणात देहाद्रोई यांची चौकशी करत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. पंतप्रधानांविरोधात कट रचण्यात मिश्रा यांचा सहभाग होता, असा आरोप आपण करणार नाही, असे आश्वासन देहद्रोई यांनी दिल्याचे न्यायालयाने नमूद केले. मोठ्या व्यासपीठावरुन, सभातून आपण मिश्रा यांच्यावर कोणताही बेछूट आरोप करणार नसल्याचे आश्वासन पण देहाद्रोई यांनी न्यायालयात दिले. त्यांनी याप्रकरणात त्यांच्याविरोधात कोणताही आदेश पारीत न करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.
आपल्याकडे सज्जड पुरावा
वकील देहाद्राई यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना पिनाकी मिश्रा यांच्याविरोधात सज्जड पुरावे असल्याचे म्हटले आहे. हे पुरावे आपण सीबीआयसमोर सादर केल्याचा दावा त्यांनी केला. ‘मिश्रा यांनी पंतप्रधानांविरोधात कट रचला आहे. त्याबाबत 140 पानांचा पुरावा आहे. मी माझा जीव धोक्यात घालून हे पुरावे गोळा केले आहेत. मी कोर्टात उघडपणे हे काही सांगणार नाही, पण माझे वकील न्यायमूर्तींसमोर पुरावे ठेवतील, त्यावरुन स्पष्ट होईल के हे केवळ आरोप नव्हते.’ असा युक्तीवाद देहाद्राई यांनी केला. देहाद्राई यांचे वकील राघव अवस्थी यांनी कोर्टाला सांगितले की, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार महुआ मोईत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांच्यात घनिष्ठ मैत्री असल्याचा युक्तीवाद केला. प्रकरणात 29 जुलै रोजी पुढील सुनावणी होईल.